दुसऱ्या लाटेची शक्यता,यंत्रणा दक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 05:00 AM2020-11-19T05:00:00+5:302020-11-19T05:00:17+5:30
कोरोना संक्रमणाच्या काळात जिल्ह्याला दररोज ३५६ ऑक्सिजन सिलिंडर लागत होते. हीच बाब लक्षात घेत दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेत २० टक्के ऑक्सिजन सिलिंडर राखीव ठेवण्यात आले आहे. शासकीय तसेच खासगी रुग्णालयाला सुध्दा यासंबंधिच्या सूचना देण्यात आल्या. यासाठी कोविड केअर सेंटर असलेल्या खासगी रुग्णालयाच्या संचालकांची बैठक घेवून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरिश मोहबे यांनी त्यांना आवश्यक सूचना दिल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : डिसेंबर आणि जानेवारी मध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याच पार्श्व भूमीवर जिल्हा आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे. कोरोनाची दुसरी लाट आल्यास काय उपाययोजना करायच्या याचे नियोजन आतापासूनच सुरु केले आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता रुग्णालयातील २० टक्के बेड राखीव ठेवण्यात आले आहे. तसेच खासगी रुग्णालयांना सुध्दा या संदर्भातील सूचना करण्यात आल्या आहे. जिल्ह्यात पूर्वी १६ कोविड केअर सेंटर सुरु होते. मात्र रुग्ण संख्या कमी झाल्याने सध्या स्थितीत केवळ ११ कोविड केअर सेंटर सुरु आहे. मात्र जे कोविड केअर सेंटर सध्या बंद आहेत त्यांना सुध्दा पूर्ववत सज्ज करण्याचे काम सुरु आहे.
कोरोना संक्रमणाच्या काळात जिल्ह्याला दररोज ३५६ ऑक्सिजन सिलिंडर लागत होते. हीच बाब लक्षात घेत दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेत २० टक्के ऑक्सिजन सिलिंडर राखीव ठेवण्यात आले आहे. शासकीय तसेच खासगी रुग्णालयाला सुध्दा यासंबंधिच्या सूचना देण्यात आल्या. यासाठी कोविड केअर सेंटर असलेल्या खासगी रुग्णालयाच्या संचालकांची बैठक घेवून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरिश मोहबे यांनी त्यांना आवश्यक सूचना दिल्या. तसेच कोविड रुग्णांसाठी ५० टक्के औषधीचा साठा सुध्दा उपलब्ध करुन ठेवण्यात येणार आहे.
कोविडसाठी निवड करण्यात आलेल्या सहा खासगी रुग्णालयात २० टक्के बेड सुध्दा राखीव ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे. एकंदरीत कोरोनाचा संसर्ग वाढल्यास त्याला वेळीच पायबंद लावण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासन पूर्णपणे कामाला लागला आहे.
सेंटर, डॉक्टर्स, औषधांसाठी तयारी
५० टक्के औषधांचा साठा राखीव ठेवण्यात आला आहे. तसेच ७३ डॉक्टर, ५७ नर्सेस व इतर ४० कर्मचारी आणि ग्रामीण भागासाठी जवळपास ५ हजार डाॅक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा स्टॉफ सज्ज ठेवण्यात आला आहे.
लाट येऊ नये म्हणून...
जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट येवू नये यासाठी कोरोनाच्या टेस्टची संख्या वाढविण्यात येणार आहे. समूह संपर्कात येणाऱ्यांची कोरोना टेस्ट करण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने भाजी विक्रेते, व्यावसायिक यांचा समावेश असणार आहे. माझे कुटुंब माझी जवाबदारी मोहीमे दरम्यान आढळलेल्या गंभीर आजाराच्या रुग्णांवर नजर ठेवली जाणार असून त्यांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्क, सॅनिटायझर यांचा वापर आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन काटेकोरपणे कसे केले जाईल यावर सुध्दा भर दिला जात आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात राहावा, पुन्हा दुसरी लाट येऊ नये दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यावर भर दिला जात आहे. कोरोनाच्या टेस्ट वाढविण्यात येईल. तसेच गंभीर आजाराच्या रुग्णांवर आरोग्य यंत्रणेची बारीक नजर राहील. दीपक कुमार मीणा जिल्हाधिकारी, गोंदिया.