शिकारीच्या कलेअभावी ‘चांदनी’ झाली परावलंबी
By admin | Published: March 17, 2017 01:33 AM2017-03-17T01:33:37+5:302017-03-17T01:33:37+5:30
शिक्षण-प्रशिक्षण जीवन जगण्याचे कौशल्य शिकविते. ते एखाद्यासाठी जीवन जगण्याची कला असते तर कुणाला आकाशात उंच भरारी
संपूर्ण जीवन मानवाच्या दयेवर निर्भर : पर्यटक राहणार दर्शनापासून वंचित
गोंदिया : शिक्षण-प्रशिक्षण जीवन जगण्याचे कौशल्य शिकविते. ते एखाद्यासाठी जीवन जगण्याची कला असते तर कुणाला आकाशात उंच भरारी मारण्याची प्रेरणा देते. शिक्षणापासून वंचित राहणाऱ्याचे जीवन एखाद्या गुलामीपेक्षा कमी नसते असे म्हणतात. हीच बाब माणसासह वन्य प्राण्यांसाठीसुद्धा लागू होते.
नवेगावबांध येथील राष्ट्रीय उद्यानात सळाखींच्या मागे जीवन जगत असलेल्या साडेचार वर्षांच्या मादी बिबटचे जीवनसुद्धा अशाच स्थितीतून जात आहे. ही मादी वाघ प्रजातीची असतानासुद्धा शिकारीच्या कलेपासून वंचित आहे. त्यामुळे तिचे संपूर्ण जीवन पिंजऱ्यात कैद झाले आहे.
राष्ट्रीय उद्यानात पूर्वी अनेक वन्यप्राणी होते. या सर्वांना बघण्यासाठी दूर-दूरून पर्यटक येत होते. परंतु आता केवळ एकटी चांदनी नामक मादा बिबट येथे बाकी राहिली आहे.
सन २०१३ मध्ये जेव्हा तिला नागपूरच्या सेमिनरी हिल्सवरून नवेगावबांधच्या नॅशनल पार्कमध्ये आणण्यात आले तेव्हा ती केवळ सहा महिन्यांची होती. भिवापूर-उमरेडच्या जंगलात ती जखमी अवस्थेत इकडे-तिकडे भटकत आढळली होती.
लहानशा वयात वेगळी झाल्यामुळे मातेपासून मिळणाऱ्या शिक्षणापासून ती वंचित राहिली. ती शिकार करण्याची कला शिकू शकली नाही. त्यामुळे आता तिचे संपूर्ण जीवन वेगळ्या पद्धतीने कैद्याप्रमाणे मानवाच्या दयेवर निर्भर राहिले आहे. लहानपणापासून तरूण व वृद्धावस्थासुद्धा याच सळाखींच्या मागे घालवावी लागणार आहे.
एवढा दंड तर तिला केवळ यासाठी मिळाला की ती मातेपासून जीवन जगण्याची कला शिकू शकली नाही. (प्रतिनिधी)वन्यजीव विभागावर पडतोय भार
वनाचा राजा समजल्या जाणाऱ्या वाघाच्या प्रजातीची ही मादी बिबट आहे. तरीही ती शिकार करीत नसल्यामुळे चांदनी स्वत:च कोणाची शिकार तर होणार नाही, अशी चिंता वन अधिकाऱ्यांना सतावत आहे. आतापर्यंत सामान्य पर्यटकांचे मनोरंजन करीत असलेली मादी बिबट आता पर्यटकांच्या दर्शनासाठी ठेवण्यासही वनाधिकारी घाबरत आहेत. यासाठी वन्यजीव कायदा बाधा बनत आहे. त्यातच चांदनीची निष्क्रियतासुद्धा मोठी समस्या आहे. साडेचार वर्षांची ही चांदनी संपूर्ण जीवन वन्यजीव विभागावर भार बणून राहिली आहे.