चंद्राच्या कलेप्रमाणे ‘चंद्रकला’ने वाढविला व्यवसाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 10:22 PM2017-12-27T22:22:03+5:302017-12-27T22:22:16+5:30
सालेकसा तालुक्याच्या चिचटोला येथील प्रगती स्वयंसहायता महिला बचत गटाच्या सचिव चंद्रकला गेंदलाल शिवणकर यांनी गटातून कर्ज घेवून दुग्ध व्यवसायासाठी एक गाय खरेदी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सालेकसा तालुक्याच्या चिचटोला येथील प्रगती स्वयंसहायता महिला बचत गटाच्या सचिव चंद्रकला गेंदलाल शिवणकर यांनी गटातून कर्ज घेवून दुग्ध व्यवसायासाठी एक गाय खरेदी केली. एका गायपासून दोन गाई व नंतर दुग्ध विक्री सुरू करून आपल्या पूर्वीच्या मजुरी व शेतकामाला बगल दिली. चंद्राच्या कलेप्रमाणे ‘चंद्रकला’ने आपला व्यवसाय वाढविल्याने त्यांना सर्व खर्च वगळता निव्वळ नफा सात हजार रूपये दरमहा मिळत आहे.
चंद्रकला बचत गटात येण्यापूर्वी शेतकाम व मजुरी करीत होत्या. गावात तीन बचत गट सुरू होते. सहयोगिनींनी सर्व महिलांनी बचत गट तयार करण्याबाबत मार्गदर्शन केले. त्यामुळे त्यांनी १० ते १२ सदस्यांचा गट तयार केला. गटाला सर्व प्रशिक्षणही देण्यात आले. सहा ते बारा महिन्यात गटाचा व्यवहार सुरू झाला. गटाचे ग्रेडेशन व आॅडीट झाले. ते बँक लिंकसाठी पात्र ठरले.
यानंतर महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सहयोगिणी उषा पटले यांच्या सहकार्याने गटाचे बँक प्रस्ताव तयार करण्यात आले. गटाला एक लाख ३२ हजार रुपयांचे कर्ज मिळाले. त्यातून चंद्रकला यांनी ६० हजार रूपयांचे कर्ज घेवून गाय खरेदी केली.
देखभाल, चारापाणी, दूध काढणे त्या स्वत: करू लागल्या. कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी त्यांनी पुन्हा सीआयएफचे २० हजारांचे कर्ज घेतले. आता त्यांच्याकडे दोन गाई आहेत.
दररोज १५ ते २० लिटर दूध होवू लागले. ग्रामसंस्था व माविमच्या मार्गदर्शनातून त्यांच्या विशाल दुग्ध संकलन केंद्राला दूध गावातच मिळू लागले. ३० ते ३२ रूपये लिटर दर मिळत आहे. पशुखाद्य सुद्धा त्याच केंद्रात उपलब्ध आहे.
आज त्यांना महिन्याकाठी सात हजार रूपये सर्व खर्च वगळता शुद्ध नफा होत आहे. दूध गावातील दुग्ध डेअरीत जात असल्यामुळे त्यांचा वेळ, येण्या-जाण्याचे श्रम व खर्च वाचत आहे. त्यामुळे त्यांना सीआयएफ व आयसीआयसीआय बँकेची किस्त भरण्यात कधीच अडचण आली नाही. कर्जाची परतफेड त्या नियमित करीत आहेत.
त्यांच्या व्यवसायाला आता भरारी मिळाली असून सर्व गरजांची पूर्तता होत आहे. दुग्ध व्यवसायातून त्यांनी आपल्या कुटुंबाचा विकास घडवून आणला.
दुग्ध व्यवसायाच्या नव्या दिशेसाठी
सालेकसा तालुक्यापासून चिचटोला गाव १८ किमी अंतरावर आहे. कुटुंबसंख्या १५० आहे. माविमच्या सखी लोकसंचालित साधन केंद्रांतर्गत ११ बचत गट आहेत. त्यापैकी प्रगती स्वयंसहायता महिला बचत गट हा महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत १२ ओबीसी महिलांचा आहे. २० जानेवारी २०१४ रोजी सदर गट उन्नती ग्रामसंस्थेला जोडून आपले सभासद शुल्क देवून दशसूत्रीचा अवलंब करीत आहे. गटाची एकूण बचत ६० हजार रूपये आहे. या गटातील सचिव तथा बुक कीपर चंद्रकला शिवणकर यांनी आपल्या दुग्ध व्यवसायाला नवी दिशा देण्यासाठी विविध माध्यमातून माहिती व प्रशिक्षण घेतले. पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून प्रशिक्षण व कार्यशाळा, पशुसखींच्या माध्यमातून औषधोपचार व लसीकरण गावातच होत आहे. माविमच्या माध्यमातून वेळोवेळी प्रशिक्षण, पैशाचा विनियोग योग्य होत आहे. तसेच छाणनी समितीच्या देखरेखीमुळे सर्व हिशोब, नियम, परतफेडीची सवय लागून व्यवसायाला नवीन दिशा मिळाली आहे.