शेळीपालनातून घडला ‘सुरतिया’च्या संसारात बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:53 AM2018-02-24T00:53:04+5:302018-02-24T00:53:04+5:30
घरी शेती नसतानाही दुसऱ्यांची शेती ठेका किंवा बटईने करून तुटपुंज्या मिळकतीतून कुटुंब सांभाळणाऱ्या सालेकसा तालुक्याच्या धनेगाव येथील वसुंधरा स्वयंसहायता बचत गटाच्या सदस्य सुरतिया समारू नेताम यांनी गटाच्या माध्यमातून कर्ज घेवून शेळीपालनाचा व्यवसाय सुरू केला.
ऑनलाईन लोकमत
गोंदिया : घरी शेती नसतानाही दुसऱ्यांची शेती ठेका किंवा बटईने करून तुटपुंज्या मिळकतीतून कुटुंब सांभाळणाऱ्या सालेकसा तालुक्याच्या धनेगाव येथील वसुंधरा स्वयंसहायता बचत गटाच्या सदस्य सुरतिया समारू नेताम यांनी गटाच्या माध्यमातून कर्ज घेवून शेळीपालनाचा व्यवसाय सुरू केला. त्याद्वारे त्यांनी मुलांना शिक्षणही दिले व आपला आर्थिक विकास साधला.
सालेकसा तालुका स्थळापासून धनेगाव १२ किमी अंतरावर आहे. गावात १० गट असून ते माविम व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानासह जुडलेले आहेत. त्यापैकी वसुंधरा गटाची स्थापना ६ मे २०१४ रोजी करण्यात आली. या गटात १५ सदस्य असून मासिक बचत प्रत्येकी १०० रूपये आहे. गटाच्या अध्यक्ष गायत्री उईके, उपाध्यक्ष उदासा मडावी व सचिव रजनी मडावी आहेत. याच गटाच्या सुरतिया ह्या सदस्य आहेत.
सुरतिया यांच्या कुटुंबात पती, पत्नी, दोन मुले व एक मुलगी अशा पाच जणांचा समावेश आहे. पूर्वी त्यांच्याकडे शेती नव्हती. बटई किंवा ठेक्याने शेती करून मुलांचे शिक्षण व कुटुंबाचे उदरनिर्वाह करीत होत्या. त्या गटात नसताना त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. गटात आल्यानंतर त्यांनी प्रथमच अंतर्गत कर्ज घेतला. शेती व मजुरी करून त्यांनी त्या कर्जाची परतफेडही केली.
दरम्यान गावात दुर्गावती ग्रामसंस्था तयार करण्यात आली. ग्रामसंस्थेच्या होणाऱ्या दर महिन्याच्या बैठकीला त्या उपस्थित राहू लागल्या. सीआरपी व सहयोगिनी यांच्या मार्गदर्शनामुळे व त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे त्यांनी दुसरे कर्ज घेण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी प्रशिक्षणही घेतले.
पती व गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने त्यांनी आयसीआयसीआय बँकेत एक लाख ६५ हजार रूपयांचा प्रस्ताव सादर केला. तो मंजूर झाल्याने त्यांना एक लाख ६५ हजार रूपयांचे कर्ज उपलब्ध झाले.
या कर्जाच्या काही पैशातून त्यांनी मुलांना शिक्षण दिले व उर्वरित रकमेतून त्यांनी चार शेळ्या खरेदी केल्या. त्यानंतर त्यांनी पशुसखींना भेट दिली.
पशुसखीकडून शेळ्यांना नियमित लसीकरण केले जाते. योग्य काळजी घेतली जाते. त्यामुळे त्यांच्या शेळीपालन व्यवसायात भर पडली व त्यांच्या आर्थिक परिस्थितीत चांगला बदल घडून आला. शेळीपालन व पतीची मजुरी यातून त्या नियमितपणे कर्जाची परतफेड करीत आहेत. आता त्यांच्या परिस्थितीत सुधारणा घडून आल्याने त्यांनी माविम व गटाचे आभार मानले.