पहिल्या वर्गात प्रवेशित विद्यार्थ्यांच्या अटीत वेळोवेळी बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:20 AM2021-06-26T04:20:56+5:302021-06-26T04:20:56+5:30
केशोरी : शालेय शिक्षण विभागाच्या इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी वयाची अट सहावर्षे ऐवजी पाच वर्षे केल्यामुळे शिक्षकांना अडचण निर्माण ...
केशोरी : शालेय शिक्षण विभागाच्या इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी वयाची अट सहावर्षे ऐवजी पाच वर्षे केल्यामुळे शिक्षकांना अडचण निर्माण केली आहे. ३० सप्टेंबर रोजी सहा वर्षे पूर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्या वर्गात प्रवेश देण्याची प्रचलित पद्धत होती. आता ती मुदत ३१ डिसेंबर वाढवून दिल्याचे शासन निर्णय जारी झाल्याने प्रवेशाचा गोंधळ निर्माण झाला आहे.
आरटीई कायद्यानुसार मोफत शिक्षणाच्या अधिन राहून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून सहा वर्षे पूर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्या वर्गात प्रवेशित विद्यार्थी समजून प्रवेश देण्यात यावा, असे यापूर्वीचे आदेश होते. परंतु या पूर्व आदेशाला राज्याच्या प्राथमिक शालेय शिक्षण विभागाने रद्द केले. सहा वर्षाच्या निकषात बदल करून त्या ऐवजी साडेपाच वर्षे वयाच्या प्रवेशित बालकांना इयत्ता पहिलीत प्रवेश देण्याचे धोरण निश्चित केले आहे. यामुळे शाळेच्या पटसंख्येत थोडीफार वाढ होईल. परंतु पुढील वर्षी यावर्षीच्या प्रवेशित विद्यार्थ्यांना साडेसहा वर्षे पूर्ण होतील आणि आरटीई कायद्याच्या अधिन राहून इयत्ता पहिलीऐवजी सरळ दुसऱ्या वर्गात प्रवेश द्यावा लागणार आहे. अशावेळी महत्त्वाची बाब म्हणजे जानेवारी महिन्यात जन्म झालेला बाळ दुसऱ्या वर्गात असेल अशी स्थिती निर्माण होऊन शालेय शिक्षण विभागाच्या गोंधळात गोंधळ वाढला आहे. त्यामुळे पालकांमध्ये सुध्दा संभ्रम निर्माण झाला आहे.