कन्हाळगाव येथे दोन गटात राडा; पाच जणांच्या खुनाचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 03:23 PM2023-07-31T15:23:01+5:302023-07-31T15:26:25+5:30
मागील वर्षी पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू हे वादाचे कारण : दोन गटातील ६ जणांवर गुन्हा दाखल
गोंदिया : देवरी तालुक्यातील ग्राम कन्हाळगाव येथे वर्षभरापासून दोन गटात कलगीतुरा रमायचा. परंतु वर्षभरापासून सुरू असलेल्या या ठिणगीचे वादात रूपांतर झाले. शुक्रवारी (दि.२८) दोन गटात चक्क राडा झाला. यात दोन गटातील पाच जणांच्या खुनाचा प्रयत्न झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्या पाचही जणांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. या संदर्भात शनिवारी (दि.२९) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्राम कन्हाळगाव येथे शुक्रवारी (दि.२८) सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास रवींद्र चैतराम पटले (४६) यांचा मुलगा लोकेश पटले हा मागील वर्षी पाण्यात बुडून मरण पावला. परंतु माझ्या मुलाच्या मृत्यूला पवन विनोद वट्टी (२२) हा कारणीभूत असल्याचे गृहीत धरून आरोपी रवींद्र चैतराम पटले व त्यांच्या कुटुंबीयांनी नेहमीप्रमाणे शिवीगाळ केली. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता रवींद्र पटले हा शिवीगाळ करीत असताना त्यांच्यात वाद झाला. परिणामी आरोपी रवींद्र पटले, विजय मणिराम पटले (३२) व चेतराम गोपीचंद पटले (७०, तिघे रा. कन्हाळगाव) यांनी विनोद ढेकल वट्टी (४५) व पवन विनोद वट्टी (२२, दोघे रा. कन्हाळगाव) या बापलेकांवर काठीने वार करून त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला. या संदर्भात विनोद ढेकल वट्टी यांच्या तक्रारीवरून देवरी पोलिसांनी आरोपींवर भादंविच्या कलम ३०७, ३२४, ५०४, ३४ सहकलम ३, २, ५ अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास तिरोड्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मडामे करीत आहेत.
तर दुसऱ्या गटातील विजय मणिराम पटले (३२, रा. कन्हाळगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार रवींद्र पटले यांचा मुलगा लोकेश पटले हा मागील वर्षी पाण्यात बुडून मरण पावला. त्यामुळे आरोपी त्र्यंबक पुरुषोत्तम पारधी (२४) हा रवींद्र पटले यांना पाहून हसत असतो. त्यामुळे अधिक चिडलेल्या पटले कुटुंबीयांचा आणि वट्टी कुटुंबीयांचा वाद झाला. या वादात दुसऱ्या गटातील आरोपी विनोद वट्टी, पवन उर्फ रितिक वट्टी व त्र्यंबक पारधी (२४, तिघे रा. कन्हाळगाव) यांनी भांडण करून विजय पटले (३२), रवींद्र पटले (४६) व शेवंता चैतराम पटले (६५, तिन्ही रा. कन्हाळगाव) यांच्या डोक्यावर काठीने मारून त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला. या घटनेत एकंदरीत पाच जणांच्या खुनाचा प्रयत्न झाल्याने विजय पटले यांच्या तक्रारीवरून तिघांवर भादंविच्या कलम ३०७, ३२६, ३२४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक मुकुंद जाधव करीत आहेत.
यांचा झाला खुनाचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
-- या वादात विनोद ढेकल वट्टी (४५), पवन विनोद वट्टी (२२) या बापलेकांना तर दुसऱ्या गटातील विजय मणिराम पटले (३२), रवींद्र चैतराम पटले (४६) व शेवंता चैतराम पटले (६५, सर्व रा. कन्हाळगाव) या पाचही जणांच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला. ते पाचही लोक गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.