मनरेगाच्या कामात अनागोंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 11:58 PM2018-07-04T23:58:27+5:302018-07-04T23:58:50+5:30
तिरोडा पंचायत समिती अंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना प्रत्येक ग्रामपंचायत माध्यमातून राबविण्यात येत आहे. मात्र या योजनेत मोठा घोळ सुरू असून नियमांना डावलून कामे केली जात असल्याचा आरोप लाभार्थ्यांनी केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परसवाडा : तिरोडा पंचायत समिती अंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना प्रत्येक ग्रामपंचायत माध्यमातून राबविण्यात येत आहे. मात्र या योजनेत मोठा घोळ सुरू असून नियमांना डावलून कामे केली जात असल्याचा आरोप लाभार्थ्यांनी केला आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत गाव विकासासाठी ग्रामसभेच्या माध्यमातून विविध विकास कामांचे नियोजन केले जाते. यात पांदण रस्ते, माती काम, मुरूम, शौचालय, वृक्ष लागवड, गोठा बांधकाम, शोषखड्डे, सिमेंट रस्ते, खडीकरण, भातखाचर व नाला सरळीकरणाच्या कामांचा समावेश आहे.मात्र तालुक्यात काही ठिकाणी कामे न करताच निधीची उचल करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. काही सुरू असलेल्या कामातील अनागोंदी कारभार पुढे आल्यानंतर शासनाने तेथील कामाचे देयके न काढण्याचे निर्देश संबंधितांना दिले. मात्र यानंतरही देयक काढली जात असल्याची माहिती आहे. तालुक्यातील काही कामांबद्दल नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. चौकशी न करता काढली जात आहे. जुन्या शौचालयांना पैसे देण्यात आले आहेत. पांदण रस्ता, मुरुम कामाचे देयक देण्यात येऊ नये, असे आदेश सचिवांनी दिले आहे. तरी अधिकाऱ्यांनी शौचालये व गोठ्यांच्या बिलांमध्ये अधिकच्या रक्कमेचा समावेश करुन निधी वितरीत केला जात आहे. चांदोरी खुर्द येथील पांदण रस्त्याचे काम करण्यात आले. तेसुद्धा फक्त १०० मीटरच्या आत पण त्या ठिकाणी मुरुम १९ ब्रॉस टाकण्यात आले. बाकीचे मुरूम खडीकरणाच्या रस्त्यावर टाकण्यात आले. याची तक्रार करण्यात आली आहे. पण खंडविकास अधिकारी, विस्तार अधिकारी व कनिष्ठ अभियंता यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे.
अर्धे आम्ही-अर्धे तुम्ही
तिरोडा पंचायत समिती अंतर्गत कामात पांदण रस्त्याचे देयक मोजमाप न करता सरळ पुस्तिकेत नोंद करून पैसे घेतले. अर्धे आम्ही-अर्धे तुम्ही या तत्वावर या योजनेतंर्गत अनागोंदी कारभार सुरू आहे. गोठे, वृक्ष, शौचालय, रस्ते, मुरुम या कामांत बोगस मजुरांची नावे दाखवून पैसे घेतले जातात. या सर्व कामांबाबत तालुक्यातील व चांदोरी खुर्द येथील रस्ते व शौचालयांची व गोठ्यांची चौकशी करण्यात यावी. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
काम रस्त्याचे, पैसे गोठ्याचे
तिरोडा पं.स. खंडविकास अधिकारी यांना विचारले असता, याची मला जाणीव नाही व मी नवीन आलेला आहे. चौकशी करुन सांगतो असे सांगितले. सदर देयकाची कामे ही तत्कालीन खंडविकास अधिकारी यांचे अपघात झाले होते, त्या काळातील होते. त्यानंतर प्रभारी कार्यभार दुसऱ्या अधिकाऱ्याकडे देण्यात आला. त्यांनी सदर बिल काढून दिल्याचे सांगितले. कनिष्ठ अभियंता रामदास बावणकर यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, मी ११७ ब्रासची मोजमाप पुस्तिकेत करुन दिली, पण स्वाक्षरी केली नाही. माझ्यावर काही जणांनी दबाव टाकला. सदर मोजमाप पुस्तिका चुकीची आहे, असे त्यांनी सांगितले.