चपराशाने अधिकाऱ्यांचे आदेश झुगारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 01:12 AM2018-05-12T01:12:57+5:302018-05-12T01:12:57+5:30
नगर परिषद पाणी पुरवठा सभापती व नगरसेवकांच्या वादाचे प्रकरण अधिकच चिघळले असून सभापतींनी त्या नगरसेवकाच्या प्रभागात टँकर पाठवू नका असे आदेश दिले आहेत. एवढेच नव्हे तर पाणी पुरवठा विभागातील चपराश्याने चक्क प्रशासनीक अधिकाऱ्यांचा आदेश झुगारले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नगर परिषद पाणी पुरवठा सभापती व नगरसेवकांच्या वादाचे प्रकरण अधिकच चिघळले असून सभापतींनी त्या नगरसेवकाच्या प्रभागात टँकर पाठवू नका असे आदेश दिले आहेत. एवढेच नव्हे तर पाणी पुरवठा विभागातील चपराश्याने चक्क प्रशासनीक अधिकाऱ्यांचा आदेश झुगारले. यामुळे कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवक चांगलेच संतापले आहे.
पाण्याच्या टँकरला घेऊन प्रभाग क्रमांक २१ चे नगरसेवक भागवत मेश्राम व नगर परिषद पाणी पुरवठा समिती सभापती दीपक बोबडे यांच्यात बुधवारी (दि.९) मोबाईलवरच शाब्दीक बाचाबाची झाली होती. यावर नगरसेवकांनी हे प्रकरण फेसबूकवर टाकले होते. त्यानंतर शुक्रवारी (दि.११) नगरसेवक मेश्राम यांनी पाणी पुरवठा विभागात फोनकरून टँकरची मागणी केली. मात्र पाणी पुरवठा विभागातील चपराशी बंसोड याने तुमच्या प्रभागात टँकर पाठवायचा नाही असे आदेश दिल्याचे सांगीतले. यावर मेश्राम यांनी कॉँग्रेस पक्षातील सर्व नगरसेवकांना माहिती दिली व त्यांनी प्रशासनीक अधिकारी सी.ए.राणे यांना सांगीतले. राणे यांनी बंसोड याला फोनकरून टँकर पाठविण्यास सांगीतले असता बंसोड याने त्यांचाही आदेश झुघारला. दरम्यान, माजी नगरसेवक राकेश ठाकूर, नगरसेवक सुनील भालेराव, सुनील तिवारी, क्रांती जायस्वाल, भागवत मेश्राम, देवा रूसे आदिंनी बांधकाम समिती सभापती शकील मंसूरी यांच्या उपस्थितीत त्यांच्या दालनात मुख्याधिकारी चंदन पाटील व प्रशासनीक अधिकारी राणे यांना बोलाविले. येथे सर्वांनी सभापती बोबडे यांच्या या कृत्याचा निषेध व्यक्त केला. सर्वांनी राजकारण ही वेगळी बाब असून कुणाच्या प्रभागात पाणी न पाठविणे हे उचीत नसून या प्रकारावर तोडगा काढण्यास सांगीतले. विशेष म्हणजे, सभापती बोबडे यांच्या या कृत्यामुळे कॉँग्रेस पक्षातील नगरसेवक चांगलेच खवळले आहेत. त्यामुळे आता हे प्रकरण आणखी काय वळण घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बंसोड याचे तडकाफडकी स्थानांतरण
सभापती मंसूरी यांच्या दालनात प्रशासनीक अधिकारी राणे यांनी मुख्याधिकारी पाटील यांच्यासमोर बंसोड याने त्यांचा आदेश झुगारल्याचे सांगीतले. या प्रकारानंतर कॉंग्रेस पक्षातील नगरसेवकांनी बंसोड याचे त्वरीत स्थानांतरण करण्याची मागणी केली. यावर मुख्याधिकारी पाटील यांनी मागणी करेल त्याला पाण्याचा पुरवठा केला जाईल असे सांगत बंसोड यांचे त्वरीत स्थानांतरण करण्यास राणे यांना सांगीतले.