काठीने मारल्याने तरुण मेल्याची अफवा पसरली अन् लोकांनी केली स्टेजवर दगडफेक; ५२ जणांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2023 05:29 PM2023-03-08T17:29:37+5:302023-03-08T17:40:04+5:30
गर्दीला पांगविणाऱ्या पोलिसांवरही दगडफेक : पोलिसांच्या वाहनाची तोडफोड
सडक अर्जुनी (गोंदिया) : तालुक्यातील केसलवाडा येथे इनामी शंकरपटाचे आयोजन ३ ते ५ मार्च दरम्यान करण्यात आले होते. परंतु या शंकरपटात चंद्रहास परशुरामकर (२२) रा. खोडशिवनी या तरुणाला राजकुमार हेडावू याने काठीने मारल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची अफवा पसरली. या प्रकाराने संतप्त झालेल्या उपस्थित नागरिकांनी स्टेजकडे धाव घेत स्टेजवर दगडफेक केली. तर या गर्दीला पांगविण्यासाठी आलेल्या डुग्गीपार पोलिसांच्या वाहनावर देखील दगडफेक करण्यात आली. ही घटना ५ मार्चच्या सायंकाळी ५.४५ वाजता घडली.
विदर्भातील मोठ्या इनामी शंकरपटाचे आयोजन ३ ते ५ मार्च रोजी केसलवाडा येथे करण्यात आले होते. हा शंकरपट पाहण्यासाठी परिसरातील शेकडो नागरिकांनी व पटशौकीनांनी प्रचंड गर्दी केली होती. ही गर्दी पांगविण्यासाठी पटसमितीचे अध्यक्ष राजकुमार हेडाऊ यांनी काठीचा वापर केला. यात चंद्रहास परशुरामकर (२२) रा. खोडशिवनी याच्या डोक्यावर काठी लागल्याने यात त्याचा मृत्यू झाल्याची अफवा पसरल्याने वातावरण तापले. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी पटसमितीच्या स्टेजच्या दिशेने दगडफेक सुरू केली. त्यामुळे शेवटी पट बंद करावा लागला. ५ मार्चला पटाचे फायनल होते. या पटामध्ये ७ लाख रुपयाचे संपूर्ण बक्षीस असल्यामुळे शेवटच्या जोेड्या सुटण्याची वाट पाहत असतांना नागरिकांनी एकच गर्दी केली होती.
पोलिस वाहनाची तोडफोड ५ हजारांचे नुकसान
या जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांचे वाहन एमएच ३५ डी. ०५६५ हे आले असतांना त्या वाहनावरही दगडफेक करून त्या वाहनाचे ५ हजार रूपयाचे नुकसान झाले. पोलीस हवालदार हरिश्चंद्र पंढरी शेंडे (५४) ब.नं. ५२९, यांच्या तक्रारीवरून ५२ लोकांवर डुग्गीपार पोलिसांनी भादंविच्या कलम १४३,१४४,१४५,१४७,१४९,१८६, ३५३, ४२७, सहकलम सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम कलम ३, सहकलम १३५ महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद बांबोळे करीत आहेत.
आरोपीत यांचा समावेश
या दगडफेक करणाऱ्या आरोपीत सुधीर कोरे घोटी, विलास लोखंडे बाम्हणी/खडकी व इतर ५० अशा ५२ लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद बांबोळे करीत आहेत.
ज्या मुलाला मार लागला तो रुग्णालयात दाखल असून त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे. जमावाने गोंधळ केला. त्यामुळे जमावाला पोलिसांनी नियंत्रित केल्याने अनुचित घटना घडली नाही. आम्ही गुन्हा दाखल केला आहे.
- रेवचंद सिंगनजुडे, ठाणेदार डुग्गीपार