चटोपाध्याय २४३, तर १८७ शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी लवकरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:27 AM2021-09-13T04:27:24+5:302021-09-13T04:27:24+5:30
गोंदिया : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या चर्चेच्या माध्यमातून सुटतील, या अपेक्षेने मागील दीड-दोन वर्षांपासून संघाच्या शिष्टमंडळाकडून चर्चा ...
गोंदिया : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या चर्चेच्या माध्यमातून सुटतील, या अपेक्षेने मागील दीड-दोन वर्षांपासून संघाच्या शिष्टमंडळाकडून चर्चा केली जात होती; परंतु प्रत्यक्षात मागण्या निकालात काढण्यात आल्या नाही. अशात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने शिक्षकांच्या अनेक प्रलंबित प्रश्नांसाठी आज, सोमवारी धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनाही जाणीव करून दिली होती. मात्र त्यांनी या आंदोलनाची दखल घेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) नरेश भांडारकर, मुख्य वित्त लेखाधिकारी अश्विन वाहणे व शिक्षणाधिकारी के. वाय. सर्याम यांना बोलावून चर्चा करीत २४३ शिक्षकांना चटोपाध्याय, तर १८७ शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी लवकरच लागू करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे शिक्षक संघाने आज, सोमवारचे आंदोलन मागे घेतले आहे.
संघाच्या आंदोलनाची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी व संघाच्या शिष्टमंडळांची त्यांच्या दालनात बैठक घेऊन चर्चा झाली. या चर्चेत ४०० ते ५०० शिक्षक चटोपाध्याय वेतनश्रेणीसाठी पात्र आहेत; परंतु त्यांना १६-१७ वर्षांपासून लाभ मिळाला नाही. वरिष्ठ निवडश्रेणी पात्र शिक्षकांनाही सेवेची २८ वर्षे लोटली. यात काही सेवानिवृत्त होऊनही लाभापासून वंचित आहेत. यावर शिष्टमंडळाची चर्चा करीत उपमुख्य कार्यकारी अधिकारी भांडारकर यांनी चटोपाध्यायचे २४३ प्रस्ताव महिनाभरात व वेतनवाढीकरिता गेलेल्या सेवापुस्तिका परत मागवून १८७ शिक्षकांचे वरिष्ठ वेतनश्रेणीचे प्रस्ताव लवकरच निकाली काढण्यात येईल असे आश्वासित केले. जिल्ह्यातील ३५६६ शिक्षक प्रत्येक महिन्यात मासिक वेतनासाठी २० ते २५ दिवस ताटकळत असतात. यामुळे शिक्षकांच्या कर्जावर अधिकचा भार पडत आहे. जीपीएफ कपातीच्या राशीबाबत सहाव्या वेतन आयोगाच्या पाच हप्त्यांची स्वतंत्र नोंद घेऊन पावत्या मिळाव्यात, आदी विषय मांडण्यात आले. या सर्व मागण्या निकाली काढण्याचे आश्वासन पाटील यांनी दिले. यावर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारचे एकदिवसीय धरणे आंदोलन मागे घेतले.
सभेचे संचालन जिल्हा सरचिटणीस एस. यू. वंजारी यांनी केले. अध्यक्ष डी. टी. कावळे यांनी आभार मानले. सभेला संघाचे नेते आनंद पुंजे, अजय चौरे, कृष्णा कापसे, वीरेंद्र भिवगडे, राजू रहांगडाले, के. एस. रहांगडाले, अनिल वट्टी, किशोर शहारे, अरुण शिवणकर, प्रकाश कुंभारे, आर. एल. सांगोडे, अशोक तावाडे, जितेंद्र गणवीर, डी. एम. दखणे, आर. एम. ठाकरे, दिनेश ढबाले, ईश्वरदास कुराहे उपस्थित होते.