चावडी, सभामंडपांवर अर्धाअधिक खर्च
By admin | Published: July 27, 2014 12:10 AM2014-07-27T00:10:33+5:302014-07-27T00:10:33+5:30
जिल्ह्यातील चारही आमदारांनी आपल्या साडेचार वर्षाच्या कार्यकाळात स्थानिक विकास निधीतील सर्वाधिक निधी सभामंडप आणि चावडी बांधकामांवर खर्च केला आहे. पण गावातील नाल्या,
गोंदिया : जिल्ह्यातील चारही आमदारांनी आपल्या साडेचार वर्षाच्या कार्यकाळात स्थानिक विकास निधीतील सर्वाधिक निधी सभामंडप आणि चावडी बांधकामांवर खर्च केला आहे. पण गावातील नाल्या, हातपंप किंवा इतर प्रकारच्या सोयीसुविधांकडे आमदारांनी पाठ फिरविल्याचे दिसून येते. त्यामुळे अनेक गावांमध्ये अजूनही अनेक सुविधांची कमतरता असल्याचे दिसून येत आहे.
आपल्या मतदार संघातील नागरिकांनी मागणी केल्याप्रमाणे विविध सार्वजनिक सोयीसुविधांसाठी आमदारांचा स्थानिक विकास निधी वापरला जाणे अपेक्षित आहे. परंतू काही आमदारांनी नागरिकांच्या सोयीपेक्षा कार्यकर्त्यांची ‘सोय’ करून दिल्याचे दिसून येते. छोट्यामोठ्या कामांचे कंत्राट आपल्या कार्यकर्त्याला देऊन खुश करण्यासाठी जास्तीत जास्त निधी बांधकामांवर खर्च करण्यात आला आहे. त्यातही सर्वच आमदारांनी सर्वाधिक प्राधान्य सभामंडपाच्या बांधकामाला दिले आहे. त्याखालोखाल चावडी बांधकाम आणि नंतर रस्त्याच्या कामांचा क्रमांक लागतो. याशिवाय बोअरवेलचेही वाटप आमदारांनी केले, पण त्यांची संख्या कमी आहे.
विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असल्यामुळे या शेवटच्या वर्षात आपल्या स्थानिक विकास निधीतून जास्तीत जास्त कामे करण्याकडे आमदारांचा कल दिसून आला. २०१३-१४ या वर्षात तिरोड्याचे आमदार डॉ.खुशाल बोपचे यांच्या विकास निधीतून जिल्हा परिषद बांधकाम विभागाअंतर्गत ७५ कामे झाली आहेत. त्यावर १ कोटी ७६ लाख ३५ हजारांचा निधी प्रस्तावित होता. त्याखालोखाल २१ लाख ८८ हजार रुपये तिरोडा नगर परिषदेतील ७ कामांसाठी मंजूर केले.
आ. गोपालदास अग्रवाल यांनी गतवर्षात सर्वाधिक ९९ लाख ५४ हजार रुपये बांधकाम विभाग (रोहयो) यांच्या १४ कामांसाठी दिले. त्यानंतर ९३ लाख ७८ हजार रुपये जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला ७१ कामांसाठी दिले. याशिवाय २५ लाख २२ हजारांची २६ कामे पाणी पुरवठा विभागाची केली आहेत.
आ.राजकुमार बडोले यांनी १ कोटी ८१ लाख ५५ हजारांची ८० कामे जि.प. बांधकाम विभागामार्फत केली आहे. तर पाणी पुरवठ्याची ५ कामे केली आहेत. आ.रामरतन राऊत यांनी १ कोटी ३६ लाख ८२ हजारांची ६१ कामे जि.प.बांधकाम विभागामार्फत केली आहेत. याशिवाय पाणी पुरवठ्याची ९ व लघु पाटबंधारे विभागाची २ कामे केली आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)