चावडीवरची शाळा ठरते विद्यार्थांना वरदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:34 AM2021-09-24T04:34:14+5:302021-09-24T04:34:14+5:30
देवरी : बालक आपल्या समाजाचे आधारस्तंभ असून, त्यांच्या विकासातच आपल्या समाजाचा किंबहुना आपल्या देशाचा विकास असतो. कोरोना महामारीच्या ...
देवरी : बालक आपल्या समाजाचे आधारस्तंभ असून, त्यांच्या विकासातच आपल्या समाजाचा किंबहुना आपल्या देशाचा विकास असतो. कोरोना महामारीच्या भीषण परिस्थितीत शाळाबंद आहेत, चिमुकली मुले शाळा आणि शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर गेलेली आहेत. अशात तालुक्यातील चिचगड परिसरातील वांढरासारख्या नक्षलग्रस्त, अतिसंवेदनशील आणि आदिवासी भागातील चावडीवर गृहपाल किशोर देशकर पत्नी आणि मित्रांसोबत ज्ञानदानाचे महत्वपूर्ण कार्य मागील वर्षभरापासून अविरतपणे करीत आहे.
नक्षलग्रस्त आणि आदिवासीबहुल क्षेत्रातील या चावडीवर विद्यार्थ्यांना दररोज निसर्गाच्या सानिध्यात शैक्षणिक मार्गदर्शन, खेळ, व्यायाम, योगासने, प्राणायाम आणि छान - छान गप्पागोष्टी, थोर पुरुषांची चरित्र, प्रार्थना, भजन व आरती सांगण्यात येतात. श्रीराम मंदिर परिसरात देशकर यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांद्वारे वृक्षारोपणसुध्दा करण्यात आले आहे. या नक्षलग्रस्त आणि आदिवासीबहुल क्षेत्रातील चावडीवर विद्यार्थ्यांना व्यसनमुक्ती, आरोग्य व स्वछतेचे धडेही दिले जातात.
..........
प्रोजेक्ट धरती बचाओ
चावडीवरच्या शाळेचा हा अभिनव प्रयोग आपल्या जिल्ह्यात नव्हे तर देशात पोहोचावा आणि कोणतेही बालक शिक्षणाच्या प्रवाहापासून वंचित राहू नये म्हणून देशकर यांनी गावातील मुले आणि त्यांच्या पालकांना सोबत घेऊन ‘चावडीवरची शाळा’ या अभिनव उपक्रमाला मागील वर्षीपासून सुरुवात केली आहे. याच माध्यमातून विद्यार्थ्यांना पशु, पक्षी आणि प्राण्यांबद्दल जाण व्हावी म्हणून ‘प्रोजेक्ट धरती बचाओ’अंतर्गत पक्ष्यांसाठी घरटी आणि पाण्याची व्यवस्थाही करण्यात आलेली आहे.
------------------------
सहकार्य करा
कोरोना काळात उदासीन झालेल्या आणि मनावर निराशेची झालर ओढलेल्या बालमनाचा शिक्षणाचा प्रवाह मोडू नये. त्यांची ज्ञान गंगोत्री अशीच अखंडित प्रवाहित राहावी म्हणून आपण सर्वांनी या देश कार्यात सहभागी व्हावे आणि सहकार्य करावे, असे देशकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी कळविले आहे.