७४०० नागरिकांना स्वस्त धान्याची सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 01:01 AM2018-02-07T01:01:52+5:302018-02-07T01:02:20+5:30
जन्म व विवाहामुळे वाढलेले सुमारे ६३१९ नागरिक व अंत्योदय योजनेच्या यादीत नाव समाविष्ट न झालेले २५ परिवार अशा एकूण सुमारे ७४०० नागरिकांच्या स्वस्त धान्याची सोय लवकरच होणार आहे.
ऑनलाईन लोकमत
गोंदिया : जन्म व विवाहामुळे वाढलेले सुमारे ६३१९ नागरिक व अंत्योदय योजनेच्या यादीत नाव समाविष्ट न झालेले २५ परिवार अशा एकूण सुमारे ७४०० नागरिकांच्या स्वस्त धान्याची सोय लवकरच होणार आहे. आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या प्रयत्नाने राज्य शासनाने या नागरिक व परिवारांची बीपीएल व अंत्योदय योजनेच्या यादीत नोंद करण्यास परवानगी दिली आहे.
शासनाकडून बीपीएल अंतर्गत प्रत्येक नागरिकाला पाच किलो धान्य दिले जात असून यासाठी पिवळे रेशनकार्ड दिले जाते. यात परिवारातील सदस्यांची संख्या नावासह नोंद असते. असे असताना मात्र मागील १०-१५ वर्षांत या परिवारांत जन्माला आलेले बाळ किंवा विवाहामुळे सदस्यांची संख्या वाढली आहे. मात्र पिवळ््या रेशनकार्डात या वाढलेल्या सदस्यांची नाव नोंद नसल्यामुळे त्यांना स्वस्त दरात धान्य मिळत नाही. तर अंत्योदय योजनेंतर्गत प्रत्येक कार्ड धारक परिवाराला ३५ किलो धान्य दिले जाते. यात दोन रूपये किलो दराने गहू व तीन रूपये किलो दराने तांदूळ दिला जात असून या लाभापासूनही कित्येक परिवार वंचीत असल्याच्या तक्रारी आमदार अग्रवाल यांना जनता दरबारातून मिळत आहेत.
यावर आमदार अग्रवाल यांनी, तहसीलदार, जिल्हा पुरवठा अधिकारी सवई, उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांची संयुक्त बैठक घेतली. बैठकीत जिल्हा पुरवठा अधिकारी सवई यांनी, तालुक्यात ७३१९ बीपीएल पात्र नागरिकांची वाढ झाली असून २५ परिवारांची अंत्योदय योजना यादीत समाविष्ट झालेले नाही. यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविले असून त्यावर काहीच न झाल्याचे सांगीतले.
यावर आमदार अग्रवाल यांनी, प्रकरणात पाठपुरावा केला असता ३० जानेवारी रोजी आदेश काढून ही अडचण दूर करून दिली. त्यामुळे आता या ७३१९ नागरिकांची पिवळ्या रेशनकार्डात तर २५ परिवाराची अंंतोदय यादीत नोंद करण्यास वाट मोकळी झाली आहे. परिणामी या सुमारे ७४०० नागरिकांच्या स्वस्त धान्याची सोय होणार आहे.
आदेश फक्त गोंदिया तालुक्यासाठी
बीपीएल पात्र ७३१९ नागरिक व २५ परिवारांच्या अंतोदय यादीत नोंदणीचा आदेश राज्य शासनाने ३० जानेवारी रोजी काढला. मात्र विशेष म्हणजे, बीपीएल व अंतोदय योजनेतील लाभार्थ्यांच्या वाढलेल्या संख्येच्या नोंदणीचे हे आदेश फक्त गोंदिया तालुक्यासाठीच असल्याची माहिती आहे.