स्वस्त गॉगल्स ठरू शकतात डोळ्यांसाठी हानिकारक ! गॉगल घेताना काय काळजी घ्यावी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 16:38 IST2025-02-28T16:37:52+5:302025-02-28T16:38:56+5:30
Gondia : गॉगल नेमका कोठून व कशा पध्दतीचा खरेदी करावा

Cheap goggles can be harmful to the eyes! What to be careful while buying goggles
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : डोळे हा शरीराचा नाजूक अवयव आहे. त्यामुळे त्याची सुरक्षितता व काळजी घेणे गरजेचे आहे. धूळ, सूर्याची तीव्रता यासह इतर बाबींमुळे डोळ्यांना त्रास होऊ नये यासाठी बहुतांश जण गॉगल्स खरेदीवर भर देतात. गॉगल नेमका कोठून व कशा पद्धतीचा खरेदी करावा, याबाबत विचार करण्यात येत नसल्याने भविष्यात डोळ्यांसाठी घातक ठरू शकते. त्यामुळे नाजूक अवयव असल्याने डोळ्यांसाठी चांगले गॉगल्स घेण्याकडे नागरिकांनी प्राधान्य दिले पाहिजे, असे नेत्रविकार तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.
उन्हाळा सुरू होताच शहरासह विविध मार्गावर गॉगल्स विक्रेते स्टॉल लावून विक्री करताना दिसतात. त्यामुळे विविध प्रकारचे गॉगल्स खरेदी करण्यावर तरुण भर देतात. मात्र, खरेदी करताना शंभरपर्यंतच्या गॉगल्सची मागणी बहुतांश जणांची असते. परिणामी, स्वस्त गॉगल्स डोळ्यांना हानिकारक ठरू शकतो.
लांब पल्ल्याचा प्रवास करताय तर घ्या काळजी
अनेक जण विशेषतः तरुण दुचाकीने लांबचा प्रवास करण्यावर भर देतात. यादरम्यान रस्त्याने जाताना उन्हापासून, धुळीपासून डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी काळजी घेणे आवश्यक असते.
हलक्या चषयामुळे डोळ्यांवर ताण, डोकेदुखी
हलक्या चषयांमुळे डोळ्यांवर ताण निर्माण होतो. शिवाय व्यवस्थित दिसत नसल्याने अंतराचा अंदाज येत नाही. परिणामी डोकेदुखीचा त्रास वाढण्याची शक्यता असते. अनेकदा डोळ्यांचा नंबर बदलत असतो. त्यामुळे स्वस्तातील चष्मा परिधान करणे महागात पडू शकते. असे गॉगल्स खरेदी करताना प्रत्येकाने विचार करणे आवश्यक असल्याचे मत नेत्रतज्ज्ञांकडून व्यक्त केले जाते.
गॉगल घेताना काय काळजी घ्यावी
उन्हाळा वाढल्याने डोळ्यांच्या सुरक्षेसाठी अनेक वेळा फुटपाथवरील गॉगल घेतला जातो. परंतु हा गॉगल डोळ्यासाठी लाभदायी ठरत नसल्याचे अनेक वेळा पुढे आले आहे. त्यामुळे गॉगल घेताना चांगल्या प्रतीचा घेऊन तो डोळ्यांसाठी अपायकारक आहे की, लाभदायक हे नेत्रतज्ज्ञांकडून समजून घेणे गरजेचे आहे.
१०० रूपयांत मिळतो चष्मा
उन्हाळा सुरू होताच विविध मार्गालगत गॉगल्सचे स्टॉल पाहायला मिळतात. फक्त ९९ रुपयांत गॉगल्स अशा पाट्याही पाहायला मिळतात. अनेक जण स्वस्तात मिळत असल्याने खरेदी करतात. पण त्याचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होईल याकडे दुर्लक्ष करतात.
ऊन तापतेय; धूळ उडतेय
मागील काही दिवसांपासून तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. सद्यःस्थितीत तापमान ३६ अंशांवर पोहोचले आहे. त्यामुळे नागरिक शक्यतो उन्हात घराबाहेर पडणे टाळत असले तरी अनेक जण रस्त्यावरून फिरताना दिसून येतात. यादरम्यान वाहनांमुळे उडणारी धूळ, ऊन हे डोळ्यांसाठी हानिकारक आहे. त्यामुळे उन्हात फिरताना नागरिकांनी गॉगल वापरणे गरजेचे आहे.