उपअभियंत्यावर फसवणुकीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 12:31 AM2017-12-20T00:31:03+5:302017-12-20T00:31:47+5:30
येथील जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागात कार्यरत उपअभियंता शिवकुमार आर. शर्मा यांनी वर्षभरात ४१ लाख ५० हजार ४०४ रूपयांचा अपहार केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येथील जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागात कार्यरत उपअभियंता शिवकुमार आर. शर्मा यांनी वर्षभरात ४१ लाख ५० हजार ४०४ रूपयांचा अपहार केला. त्याच्याविरूद्ध गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तिरोडा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला. यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागात उपअभियंता म्हणून शिवकुमार आर. शर्मा (५६) याने २८ आॅक्टोबर २०१५ ते १९ आॅक्टोबर २०१६ या वर्षभराच्या काळात तिरोडा तालुक्यातील पाच नळ योजनेच्या कामात ४१ लाख ५० हजार ४०४ रुपयांचा अपहार केला आहे. तसेच काम पूर्ण होण्यापूर्वीच कंत्राटदाराला ४७ लाख ३६ हजार ६३० रुपये अदा केले आहेत. या संदर्भात जिल्हा परिषदेने चौकशी समिती गठीत केली होती. तिरोडा तालुक्याच्या सोनेखारी, बेरडीपार, लोणारा, कोयलारी व सितेपार या पाच गावातील नळ योजना कोट्यवधी रुपयातून तयार करायच्या होत्या. यात शिवकुमार शर्मा यांनी मोठ्या प्रमाणात पैशाचा अपहार केला. शर्मा यांच्याकडे त्या काळात कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा हे पद होते. पाणी पुरवठा योजनांच्या खर्चा संदर्भात ४ टक्के, सादील खर्चात अनियमितता केल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले होते. वरिष्ठांची मंजुरी न घेता २१ लाख ५० हजार ९०८ रुपये व राज्य शासनाची परवानगी न घेता १ कोटी २९ लाख ४३ हजार ८९८ रुपये शर्मा यांनी खर्च केले होते. १७ मार्च २०१० च्या शासन निर्णयाला डावलून शर्मा यांनी नळ योजनेचे काम चुकीच्या पद्धतीने केले होते. काम अपूर्ण असल्यामुळे त्या योजनांचे मुल्यांकन करता येत नसतांनाही त्या योजनांचे मूल्यांकन केल्याचे खोटे गोषवारे तयार करुन समितीमार्फत कंत्राटदारास पैसे दिले आहे. जो कंत्राटदार पाणी पुरवठा योजनेचे काम करतो त्या कामाची दहा टक्के रक्कम वर्षभर थांबवून ठेवावी लागते. त्या योजनेत काही त्रुट्या असल्या, बांधकाम चुकीचे असले किंवा तुट-फुट झालेल्या साहित्याची दुरुस्ती करण्यासाठी १० टक्के रक्कम शिल्लक ठेवावी लागते. परंतु शिवकुमार शर्मा यांनी १० टक्के रक्कम म्हणजेच ४७ लाख ३६ हजार ६३० रुपये कंत्राटदाराला दिली आहे. शिवकुमार शर्मा यांनी शासनाची दिशाभूल करुन सोनेखारी, बेरडीपार, लोणारा,सितेपार व कोयलारी या पाच नळ योजनेचे ४१ लाख ५० हजार ४०४ रुपये अपहार केले आहे. त्यामुळे महाराष्टÑ नागरी सेवा (वर्तवणूक) नियम १९७९ मधील नियम ८ च्या तरतुदीनुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली. जोडपत्र १ ते ४ च्या अनुषंगाने दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहेत. शिवकुमार शर्मा विरुद्ध भादंविच्या कलम ४२०, ४६४, ४७१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
चौकशी समितीत यांचा समावेश
ग्रामीण पाणी पुरवठा येथील उपविभागीय अभियंता शिवकुमार शर्मा यांनी केलेल्या अपहार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. या समितीत उपअभियंता ग्रामीण पाणी पुरवठा एस.बी. चव्हाण, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा एस.एफ.विश्वकर्मा, मुख्य व वित्त लेखा अधिकारी ए. के. मडावी, अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी पी.बी.गावडे यांचा समावेश होता. या समितीने केलेल्या चौकशीत शिवकुमार शर्मा दोषी आढळले आहेत.