एक महिन्यापासून धानाचा चुकारा नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 09:26 PM2018-12-03T21:26:03+5:302018-12-03T21:26:48+5:30
तिरोडा तालुक्यात नऊ आधारभूत केंद्रावर धान खरेदी मागील एक महिन्यापासून सुरु आहे. शेतकऱ्यांना पीक निघाल्यावर सेवा सहकारी संस्थेचे कर्ज, सावकाराचे कर्ज, दिवाळीचा आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च व प्रपंच आदी खर्चासाठी वर्षातून फक्त एकदाच पीक विकून पैसे हातात येतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
गुलाबटोला : तिरोडा तालुक्यात नऊ आधारभूत केंद्रावर धान खरेदी मागील एक महिन्यापासून सुरु आहे. शेतकऱ्यांना पीक निघाल्यावर सेवा सहकारी संस्थेचे कर्ज, सावकाराचे कर्ज, दिवाळीचा आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च व प्रपंच आदी खर्चासाठी वर्षातून फक्त एकदाच पीक विकून पैसे हातात येतात. मात्र धान विकून एक महिना ओलांडला तरी सुद्धा धानाचा चुकारा न मिळाल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहे. त्वरित चुकारा मिळाला नाही आंदोलन छेडण्याच्या तसेच तहसील कार्यालय येथे उपोषण करण्याच्या इशारा पांडव सहकारी संस्थेचे अध्यक्ष महेंद्र भांडारकर यांनी दिला आहे.
तिरोडा तालुक्यात नवेझरी येथील पांडव सहकारी संस्थेच्यावतीने नवेझरी व विर्सी येथे आधारभूत केंद्र चालविले जातात. वडेगाव येथील नेहरु भात गिरणी सहकारी संस्थेच्यावतीने वडेगाव शेतकरी साधन सहकारी संस्था बघोलीच्यावतीने परसवाडा, तिरोडा सहकारी संस्थेच्यावतीने तिरोडा येथे सूर्यवंशी सहकारी संस्था तेढा तसेच भिवापूर, चिखली अशा नऊ केंद्रावर शेतकºयांची धान खरेदी मागील महिन्यापासून सुरु आहे. मात्र शेतकºयांना एक महिन्यापासून धानाचा चुकारा अजूनही मिळाला नाही.
शेतकºयांना यापूर्वी संस्थेच्या माध्यमातून धानाचा चुकारा देण्याची सोय होती. ती व्यवस्था शेतकरी हिताची होती. त्यावेळी धान्य खरेदी संस्थेच्या माध्यमातून केल्यानंतर त्यांची हुडी तयार करुन जिल्हा मार्केटिंग अधिकारी याची स्वाक्षरी घेवून जिल्हा बँकेत बिल सादर केले जात. त्यानंतर मुंबई मार्केटिंग फेडरेशन महाराष्टÑ शासनाच्या तिजोरीतून रक्कम संस्थेच्या खात्यावर जमा केली जात होती. संस्थेच्यावतीने धनादेशाच्या माध्यमातून शेतकºयांना रक्कम वितरीत केली जात होती व या व्यवस्थेमध्ये शेतकऱ्यांना चुकारा लवकर मिळत असे.
परंतु सध्या आॅनलाईन धान खरेदी सुरु करण्यात आली. त्यामुळे धानाचा चुकारा सुद्धा आॅनलाईन शेतकºयांच्या खात्यात थेट जमा केला जातो. संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधील शेतकऱ्यांचा चुकारा फक्त एकाच ठिकाणावर होणार. तर लाखो शेतकऱ्यांना वेळेवर चुकारा कसा मिळणार आणि उशिर तर नक्की होणारच.
त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलेला असून शेतकऱ्यांच्या समस्यांकडे कोणताच अधिकारी लक्ष देत नाही. त्वरित शेतकºयांचा चुकारा मिळाला नाही तर आंदोलन छेडून आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा पांडव सहकारी संस्थेचे अध्यक्ष भांडारकर यांनी दिला आहे. याकडे त्वरित लक्ष द्यावे असे तिरोडा तालुक्यातील शेतकºयांची मागणी आहे.