ध्वजारोहणाला मुख्य व प्रशासकीय अधिकारी अनुपस्थित
By admin | Published: August 16, 2014 11:34 PM2014-08-16T23:34:13+5:302014-08-16T23:34:13+5:30
ध्वजारोहणाच्या नियोजित वेळेत मुख्याधिकारी व प्रशासकीय अधिकारी न पोहचल्याने अध्यक्षांनी त्यांच्या अनुपस्थितीतच ध्वजारोहण उरकून टाकले. येथील नगर परिषदेत स्वातंत्र्य दिनाच्या
गोंदिया : ध्वजारोहणाच्या नियोजित वेळेत मुख्याधिकारी व प्रशासकीय अधिकारी न पोहचल्याने अध्यक्षांनी त्यांच्या अनुपस्थितीतच ध्वजारोहण उरकून टाकले. येथील नगर परिषदेत स्वातंत्र्य दिनाच्या ६७ व्या वर्धापन दिनी हा प्रकार घडला. त्यानंतर काही वेळाने दोघे अधिकारी पोहचले व उर्वरित कार्यक्रमात सहभागी झाले.
दरवर्षी प्रमाणे नगर परिषदेत ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. नगराध्यक्षांच्या हस्ते नगर परिषदेत ध्वजारोहण करण्यात येते. या कार्यक्रमाला मुख्याधिकाऱ्यांची उपस्थिती गरजेची असते. मात्र अग्निशमन विभागातील ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात मुख्याधिकारी सुमंत मोरे यांच्या शर्टाला खोचा लागल्याने ते शर्ट बदलण्यासाठी घरी गेले. यावेळी त्यांच्या सोबत प्रशासकीय अधिकारी राणे होते. अग्निशमन विभागातील ध्वजारोहणानंतर लगेच नगर परिषदेतील ध्वजारोहणाचा कार्यक्रम होता. मात्र फाटलेला शर्ट बदलण्यासाठी मुख्याधिकारी मोरे घरी गेल्याने त्यांना उशीर झाला. परिणामी नगराध्यक्ष कशिश जायस्वाल यांनी ध्वजारोहणाचा कार्यक्रम उरकून टाकला. तर मोरे यांच्यासोबत प्रशासकीय अधिकारी राणे हे सुद्धा असल्याने ते ही ध्वजारोहणाला उपस्थित नव्हते. ध्वजारोहण आटोपल्या नंतर दोघे अधिकारी पोहचले व कार्यक्रमात सहभागी झाले. हा विषय मात्र नगर परिषदेत सध्या चर्चेचा विषय बनला आहे. (शहर प्रतिनिधी)