बाल महोत्सवात बाल कलाकारांचा आविष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 10:16 PM2019-02-25T22:16:09+5:302019-02-25T22:17:30+5:30
लोकमत बालविकास मंच, संस्कार हायस्कुल व एस.एस.एस. कोचिंग क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि.२४) जिल्हास्तरीय बाल महोत्सवाचे आयोजनाचे करण्यात आले होते. यात जिल्ह्यातील विविध शाळांनी सहभाग नोंदविला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : लोकमत बालविकास मंच, संस्कार हायस्कुल व एस.एस.एस. कोचिंग क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि.२४) जिल्हास्तरीय बाल महोत्सवाचे आयोजनाचे करण्यात आले होते. यात जिल्ह्यातील विविध शाळांनी सहभाग नोंदविला. बाल महोत्सवात एकल नृत्य, समूह नृत्य या स्पर्धांचा समावेश होता. या महोत्सवात बाल कलावंतानी शहिद झालेल्या जवानांना श्रध्दांजली अर्पण करीत उरी चित्रपटातील देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर केले. यामुळे सभागृहात देशभक्तीपर आणि भावनिक वातावरण निर्माण झाले होते. तर पुलवामा हल्यात शहिद झालेल्या परिवारातील काही दुख:चे प्रसंग सुध्दा या वेळी दाखविण्याचा प्रयत्न केला. तसेच देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी सर्व देश सक्षमपणे उभा असल्याचा संदेश सुध्दा या वेळी दिली. अनेक नृत्यप्रकारातून विद्यार्थ्यानी कलेची चुणूक दाखविली.
प्रत्येकाच्या अंगी काही ना काही सुप्त गुण असतात, पण त्यांना सादर करण्यासाठी प्रोत्साहनाची गरज असते. त्यामुळे अंगी असलेल्या कलागुणांचे सादरीकरण करण्याची प्रेरणा मिळते. अशा इच्छेला पूर्णत्वास आणण्याची महत्वाची जबाबदारी लोकमत वृत्तपत्र समुहाने नियमित जपली आहे. लोकमत वृत्तपत्राने समाजातील प्रत्येक घटकाशी जुळता यावे, यासाठी लोकमत बाल विकास मंच, युवा नेक्स्ट व सखी मंच असे महत्वाचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.
लोकमत बाल विकास मंचच्या व्यासपीठावरून बालकांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने बालक-पालक व शाळांच्या पुढाकाराने राजस्थानी भवन गोंदिया येथे प्रेक्षक आणि पालकांच्या उपस्थितीत बालमहोत्सव पार पडला.
जिल्हास्तरीय बाल महोत्सव २०१९ ची सुरूवात लोकमतचे संस्थापक तथा स्वातंत्र्य सेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या तैलचित्राला माल्यार्पण व दीप प्रज्ज्वलन करून झाली.
या वेळी संस्कार हायस्कुलचे संचालक मधू बन्सोड, एस.एस.एस. कोचिंग क्लासेसचे संस्थापक संजय शेंडे व लोकमतचे कार्यालय प्रमुख मिलींद वाढई, लोकमत जिल्हा प्रतिनिधी अंकुश गुंडावार, लोकमत समाचारचे जिल्हा प्रतिनिधी मुकेश शर्मा, इव्हेंटचे जिल्हा संयोजक श्रीकांत पिल्लेवार व जिल्हा संयोजिका ज्योत्सना शहारे उपस्थित होते.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून दिपा भौमिक, नृत्य शिक्षक राजा उपस्थित होते. त्यांनी संपूर्ण स्पर्धांचे निरीक्षण व परीक्षण करून स्पर्धा सादरीकरणावर गुण देऊन क्रमांक जाहीर केले.
जिल्ह्यातील शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवून या बाल महोत्सवाला चार चाँद लावले. या विविध स्पर्धा ठेवण्यात आल्या. ज्यात सहभागी स्पर्धकांनी आपापल्या शाळांचे प्रतिनिधित्व करीत क्रमांक मिळविण्याचा प्रयत्न पणास लावले. बाल महोत्सवात एकल नृत्य व समूह नृत्य घेण्यात आले.
स्पर्धेत जवळपास १५० विद्यार्थ्यानी एकल व समूह नृत्य सादर केले. विशेष म्हणजे या महोत्सवाला चेसवी चौरागडे, अक्षरा रामरख्यानी, अर्चिता तिवारी, सीया कछवाह, अपूर्वा भास्कर या बाल कलाकारांनी बहारदार नृत्य सादर करून सभागृहात उपस्थितीतांची दाद मिळविली.
बाल महोत्सवाचे संचालन जिल्हा संयोजक श्रीकांत पिल्लेवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मंगेश इटनकर, प्रमोद बागडे, संतोष राणे आदींनी सहकार्य केले.
मनमोहक एकल व समूह नृत्य
बाल महोत्सवावर पुलवामा येथील हल्ल्याची छाप होती. या हल्ल्यात शहिद झालेल्या वीर जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. तसेच गोंदिया येथील होरीजन शाळेच्या विद्यार्थ्यांनी सर्जीकल स्ट्राईकचे दृश्य सादर केले. तर संस्कार हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी पुलवामा येथील घटनेवर आाधिरत नृत्य सादर करीत त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला. तसेच बाल मजुरांच्या समस्येवर नृत्याच्या माध्यमातून नजर टाकली. तर गोरेगाव येथील किरसान मिशन हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नाटिकासह नृत्य सादर करुन शहिदांच्या स्मृतिनां उजाळा दिला. तसेच नृत्याच्या माध्यमातून शहिदांना श्रध्दांजली अर्पण केली. यामुळे सभागृहातील वातावरण काही क्षण भावनिक झाले होते.
मान्यवरांचे मनोगत
याप्रसंगी संस्कार हायस्कुलचे संचालक मधू बन्सोड म्हणाले, बालमहोत्सव उपक्रम स्तुत्यप्रिय आहे. शाळांच्या एकत्रितपणामुळे या महोत्सवाला यश प्राप्ती झाली. अंगी कला व गुण असतानाही त्यांना आर्थिक पाठबळ मिळत नसल्याने त्यांची दयनिय अवस्था झाली आहे. अशा गरजूंना सामोरे आणण्याचे कार्य जनतेने करावे. या व्यासपीठाला कलागुण सादर करणारी उत्तम उपमा देत अभ्यासासह विद्यार्थ्यांच्या कलागुणांना समोर आणण्यासाठी पालकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार मानले. एस.एस.एस. कोचिंग क्लासेसचे संचालक संजय शेंडे म्हणाले की एकल व समुह नृत्यात विद्यार्थ्यांनी मांडलेल्या विषयांची उजळणी सर्वांनी करावी. या बालमहोत्वात बाल मेळावाच पहायला मिळाला. यशाचे शिखर गाठण्याचे धडेही या वेळी त्यांनी दिले.
- हे ठरले विजेते
एकल नृत्य स्पर्धेत विजयी विद्यार्थी
(गट अ) : प्रथम अर्चिता तिवारी, द्वितीय आर्या बोरकर, तृतीय भैरवी पशिने.
(गट ब) : प्रथम अरशद खान, द्वितीय प्रियांशू नायक तृतीय श्रेया ढोमणे.
(गट क): प्रथम मानसी वाघाडे, द्वितीय अक्षरा रामरख्यानी, तृतीय त्रिशा चवरे.
समूह नृत्य स्पर्धेत विजयी शाळा
(प्रथम गट ) : शारदा कॉन्व्हेंट प्रथम, किरसान मिशन स्कुल गोरेगाव द्वितीय तर श्री गणेशन कॉन्व्हेंटने तृतीय क्रमांक पटकाविला.
(द्वितीय गट ) : आदर्श कॉन्व्हेंट प्रथम, संस्कार हायस्कुल द्वितीय, तर बी.बी. पब्लिक स्कूलने तृतीय क्रमांक मिळविला.
प्रोत्साहन पर बक्षीस
साकेत पब्किल स्कुल व होरिजन इग्लिश स्कुल.
सहभागी शाळांची नावे
यात होरिजोन इंग्लीश स्कूल, नूतन हायस्कूल, संस्कार हायस्कूल, साकेत पब्लिक स्कूल, शारदा कॉन्व्हेंट, बी.बी. पब्लिक स्कूल, लिटील फ्लावर, चित्रांश अॅकेडमी, एक्युट पब्लिक स्कूल, गणेशन हायस्कूल, किरसान मिशन स्कुल, सेंट झेविअर, आदर्श स्कुल यासह इतर शाळांच्या विद्यार्थ्यांनी यात सहभागी होवून आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले.