बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय प्रभारीच्या भरवशावर
By admin | Published: September 23, 2016 02:10 AM2016-09-23T02:10:14+5:302016-09-23T02:10:14+5:30
शून्य ते पाच वर्ष वयोगटातील मुलांना सकष आहार देवून त्यांच्यामध्ये अक्षर ओळख निर्माण होण्यासाठी गावागावात अंगणवाडी केंद्रांची निर्मिती करण्यात आली.
जि.प.ने लक्ष द्यावे : सर्वच कार्यालयात अधिकारी-कर्मचाऱ्यांची वाणवा
बोंडगावदेवी : शून्य ते पाच वर्ष वयोगटातील मुलांना सकष आहार देवून त्यांच्यामध्ये अक्षर ओळख निर्माण होण्यासाठी गावागावात अंगणवाडी केंद्रांची निर्मिती करण्यात आली. त्यावर अंकुश ठेवण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात जबाबदार अधिकाऱ्यांची वर्णी लावण्यात येते. परंतु अर्जुनी मोरगाव येथील कार्यालय आजघडीला ‘प्रभारी अधिकाऱ्यावर’ दिवस काढत असल्याचे दिसून येत आहे.
आदिवासी तद्वतच जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेला अर्जुनी मोरगाव तालुक्याला सध्यातरी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे ग्रहण लागल्याची स्थिती निर्माण झालेली आहे. महाराष्ट्र राज्याच्या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात प्रत्येक कार्यालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांची वाणवा प्रकर्षाणी जाणवत आहे. तालुक्याच्या ठिकाणी आस्थापना असलेले बाल विकास प्रकल्प कार्यालय, बालवयातील मुलांचे आरोग्य तसेच पोषक आहार यासंबंधी मुख्यत्वेकरुन नियंत्रण ठेवण्याचे काम करतो. सध्या या कार्यालयात गेल्या कित्येक वर्षापासून पूर्ण वेळ प्रकल्प अधिकारी मिळत नाही, हे एक तालुक्याचे दुर्भाग्यच म्हणावा लागेल.
तालुक्यात आजघडीला नियमित सुरू असलेल्या २१४ अंगणवाड्या तर ८ मिनी अंगणवाड्या सुरू आहेत. ग्रामीण भागातील सर्वसामान्यांची मुले कार्यरत असलेल्या अंगणवाड्यामधून देण्यात येणाऱ्या पोषण आहाराचा लाभ घेतात. तसेच किशोरवयीन मुली, गरोदर माता यांचासुद्धा अंगणवाडी केंद्राशी नियमित संबंध येतो. अंगणवाडी केंद्रामधून ० ते ५ वयोगटातील मुलांचे शरीर, आरोग्य सुदृढ राहावे म्हणूच बचत गटाच्या माध्यामतून आहार पुरविल्या जातो. तो आहार किती दर्जेदार असतो, याकडे कार्यालयातील अधिकाऱ्यांचा सुतराम संबंध दिसून येत नाही, असे ठिक-ठिकाणी बोलल्या जाते.
कार्यालयाला कायमस्वरुपी जबाबदार अधिकारी मागील काही वर्षापासून शोधून सापडत नसल्याने कार्यालयातील इतर कर्मचारी स्व:मर्जीने वागत असल्याचे दिसून येत आहे. सदर कार्यालयातील प्रकल्प अधिकारी पदावर देवरी येथील तुषार पवनीकर यांनी ७ जुलै रोजी कार्यभार घेतला. येथील कार्यालयाचा कार्यभार हा अतिरिक्त पदभार असल्याचे सांगण्यात येत आहे. पवनीकर हे देवरी येथून आपल्या सोयीनुसार येथील कार्यालयात भेट देत असल्याचे समजते. त्यांच्या अधिनस्त असलेल्या कर्मचाऱ्यांची साहेब आॅफीसला नसल्याने सैरावैरासारखी स्थिती कार्यालयात निर्माण झालेली दिसते. आज तालुक्यात काही ठिकाणी कार्यकर्तीच्या जागा रिक्त आहेत. मदतनिस जबाबदारी सांभाळत असल्याचे बोलल्या जाते.
बालवयातील मुलांशी निगडीत असलेला तालुका आजघडीला अधिकाऱ्यांविना पोरका असताना जिल्हा परिषद मात्र शांत आहे. तालुक्यातील बालकांमध्ये कुपोषणाचे प्रमाण कसे आहे, बालके मॅम, सॅम अवस्थेपर्यंत जात आहेत का? याकडे कुणाचेही लक्ष दिसत नाही. काही कार्यरत असलेल्या कार्यकर्त्या पोषण आहार देवून अंगणवाडी केंद्र बंद करतात. बालकांना सुसंस्कार देण्यासाठी सवड मिळत नाही, असा प्रकार सुरू असल्याचे गावातील नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.
एकंदरीत तालुक्यातील बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाचा गॉडफॉदर नियमित कार्यालयात दिसणार नाही तर तालुक्यातील २२२ अंगणवाडी केंद्राची कोणती अवस्था राहणार यांचा जि.प. प्रशासनाने गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. (वार्ताहर)