सात तालुक्यात बालकांचे कल्याण वाऱ्यावर
By admin | Published: July 2, 2016 01:55 AM2016-07-02T01:55:23+5:302016-07-02T01:55:23+5:30
बालकांची काळजी घेण्यासाठी तसेच कुपोषण निर्मुलनासाठी प्रत्येक तालुक्यात महिला व बाल विकास प्रकल्प कार्यालय सुरू करण्यात आले.
‘सीडीपीओ’ प्रभारी : वर्ग तीनच्या कर्मचाऱ्यांकडे वर्ग दोनचा प्रभार
नरेश रहिले गोंदिया
बालकांची काळजी घेण्यासाठी तसेच कुपोषण निर्मुलनासाठी प्रत्येक तालुक्यात महिला व बाल विकास प्रकल्प कार्यालय सुरू करण्यात आले. परंतु गोंदिया जिल्ह्यात सात तालुक्यात मागील चार वर्षापासून कायमस्वरूपी महिला बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्याचे पद रिक्त असल्याने त्या अधिकाऱ्यांचा कारभार वर्ग तीनचे कर्मचारी म्हणजे आंगणवाडी पर्यवेक्षिकांकडे देण्यात आला आहे.
गोंदिया जिल्ह्याच्या देवरी येथील महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात एकच कायमस्वरूपी प्रकल्प अधिकारी कार्यरत आहेत. त्यांना सोडले तर जिल्ह्यात कोणत्याच ठिकाणी महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी पद प्रभारींवर सोपविण्यात आला आहे. देवरी येथे तुषार पौनीकर हे महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. सन २०१३ मध्ये दोन महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी सेवानिवृत्त झाले व उर्वरीत ठिकाणच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यामुळे त्यांच्याठिकाणी शासनाने नविन अधिकाऱ्यांना पाठविण्यात अलो नाही. परिणामी महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारीचा प्रभार आंगणवाडी पर्यवेक्षिका यांच्याकडे सोपविण्यात आला. महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी हे पद वर्ग २ ब चे पद आहे. परंतु अधिकारी उपलब्ध नसल्याने तत्कालीन मुख्यकार्यपालन अधिकारी यांनी आंगणवाडी पर्यवेक्षिका यांच्यावरच या कामाच प्रभार दिला आहे. आमगावचा प्रभार आंगणवाडी पर्यवेक्षीका रंजना गौर, सालेकसाचा प्रभार आंगणवाडी पर्यवेक्षीका ललीता शहारे, सडक-अर्जुनीचा प्रभार आंगणवाडी पर्यवेक्षीका एस.एस. बागडे, अर्जुनी-मोरगावचा प्रभार आंगणवाडी पर्यवेक्षीकाउषा आगाशे, गोरेगावचा प्रभार आंगणवाडी पर्यवेक्षीका अवनिता श्रीवास्तव, गोंदिया १ चा प्रभार आंगणवाडी पर्यवेक्षीकाअनिता भुसावळकर, गोंदिया २ चा प्रभार आंगणवाडी पर्यवेक्षीका अंजली बावणकर तर तिरोडा प्रभार सहाय्यक बाल विकास प्रकल्प अधिकारी अंजना ढोरे यांच्याकडे देण्यात आला आहे. महिला व बाल विकास विभागाचा संपुर्ण विभागाचा कारभार प्रभाऱ्यांच्या खांद्यावर आहे. आमगाव व अर्जुनी-मोरगाव येथील अधिकारी सेवानिवृत्त झाल्यामुळे पद रिक्त झाले होते. परंतु इतर ठिकाणचे पद बदलीमुळे रिक्त झाले होते.
त्यांच्या कामाचे मुल्यामापन होणार
महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी हे पद सांभाळणाऱ्या अंगणवाडी पर्यवेक्षिका यांनी २०१३ पासून आतापर्यंत काम सांभाळले. सध्याही त्या काम करीतच आहेत. परंतु अंगणवाडी कर्मचारी युनियनतर्फे न्यायालयात टाकण्यात आलेल्या याचिका क्र.५९२० चा निकाल ४ एप्रिल २०१६ रोजी आला. त्या आंगणवाडी पर्यवेक्षिकांच्या कामाचे मुल्यमापन करावे, त्यांच्या कामाचे अनुभव घेऊन पुरेशे कारण दाखविल्याशिवाय त्यांना त्या पदावरून हटविता येणार नाही. मूल्यमापनात उत्तम अनूभव आढळला नाही तर त्यांना पदावनत व्हावे लागेल.
सहायक बीडीओंकडे प्रभार सोपविण्याचे आदेश
शासनाने सन २०१२ मध्ये सहाय्यक खंडविकास अधिकारी हे पद निर्माण करून त्यांच्यावर महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी या पदाचा कारभार सोपविण्याच्या सूचना केल्या. परंतु गोंदिया जिल्ह्यात सहाय्यक खंडविकास अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी म्हणून वर्ग तीन च्या आंगणवाडी सेविकांवर जबाबदारी सोपविण्यात आली. वर्ग २ ब च्या अधिकारी पदाची जबाबदारी वर्ग ३ च्या कर्मचाऱ्यांवरही गोंदिया जिल्ह्यात सोपविली जाते.