ग्रामीण भागातील मुले रमली मोहफूल वेचण्याच्या कामात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:27 AM2021-04-13T04:27:37+5:302021-04-13T04:27:37+5:30
केशोरी : कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता शासनाने जाहीर केलेल्या निर्बंधामुळे शाळा पूर्णत: बंद झाल्या आहेत. त्यातच आता दहावी व बारावी ...
केशोरी : कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता शासनाने जाहीर केलेल्या निर्बंधामुळे शाळा पूर्णत: बंद झाल्या आहेत.
त्यातच आता दहावी व बारावी सोडून अन्य वर्गांतील विद्यार्थ्यांना वर्गोन्नती दिली जाणार असल्याने मुले बिनधास्त झाली असून ग्रामीण व आदिवासी भागातील मुले आता मोहफूल वेचण्याच्या कामात रमल्याचे दिसत आहे.
दहावी व बारावीचे वर्ग सोडून इतर वर्गांसाठी परीक्षा न देताच विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात वर्गोन्नती देण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांची अभ्यास करण्याची काळजी मिटली आहे. एखाद्या पालकांनी अभ्यास कर असे म्हटले की, अभ्यास कशाचा करू. विनाअभ्यासानेच पास होणार आहे, अशी उत्तरे विद्यार्थ्यांकडून मिळत असतात. एकंदर विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याची काळजी राहिली नाही. वास्तविक आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शेतातील काम करण्याची आवड असते आणि त्यात आता सुट्यांची भर पडली आहे. सुट्या म्हटले की, विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत होत असतो व ती संधी कोरोना संसर्गामुळे विद्यार्थ्यांना प्राप्त झाली आहे.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरीसह राजोली, भरनोली, इळदा, परसटोला, उमरपायली, केळवद, आंभोरा, वारव्ही, गार्डनपूर, खडकी, तुकुमसायगाव, दकोटोला, डोंगरगाव इत्यादी गावे जंगलभागाशी लागत आहेत. त्यामध्ये मोहवृक्ष मोठ्या प्रमाणात असल्याने सध्या या भागात मोहफूल गोळा करण्याचा हंगाम जोरात सुरू आहे. प्रत्येक घरातील शाळकरी विद्यार्थी आपल्या आई-वडिलांना मदत म्हणून मोहफूल गोळा करण्यासाठी जंगलात जाताना दिसून येतात. विद्यार्थ्यांच्या हातातील वही-पुस्तके व पेन गायब झाल्यामुळे त्यांच्या डोक्यावर मोहफूल गोळा करण्यासाठी लागणारी टोपली बघावयास मिळत आहे. मोहफुलांचा चांगला भाव मिळत असल्यामुळे कुटुंबातील सर्व मंडळी मोहफूल गोळा करण्याच्या कामात गुंतले आहेत.