लहान मुलांची तब्ब्येत बिघडली, ओपीडीमध्ये झाली तिप्पट वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:33 AM2021-08-20T04:33:21+5:302021-08-20T04:33:21+5:30
गोंदिया : वातावरणातील बदलामुळे व्हायरल फिव्हरच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे खासगी, शासकीय रुग्णालयांत रुग्णांची गर्दी वाढली आहे. ...
गोंदिया : वातावरणातील बदलामुळे व्हायरल फिव्हरच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे खासगी, शासकीय रुग्णालयांत रुग्णांची गर्दी वाढली आहे. सर्दी, खोकला, ताप आदी लक्षणे बालकांमध्ये अधिक प्रमाणात आढळून येत आहेत. कोरोनाची तिसरी लाट ही बालकांसाठी धोकादायक ठरू शकते, असा अंदाज वर्तविला जात हाेता. मात्र, कोरोनाचा संसर्ग आटाेक्यात असला तरी व्हायरल फिव्हरमुळे बालरुग्णांचे प्रमाण वाढत आहे. काही बालकांना मलेरिया आणि डेंग्यूची सुद्धा लक्षणे आढळत आहेत. तर चार-पाच दिवसांपेक्षा अधिक दिवस ताप असणाऱ्या बालकांची कोरोनाची चाचणीसुद्धा केली जात आहे. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बालरोग विभागाच्या ओपीडीत दररोज ७० ते ८० बालकांची तपासणी केली जात आहे. तर खासगी रुग्णालयामंध्ये बालरुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. वातावरणातील बदलाचा बालकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून त्यांना सर्दी, खोकला आणि तापाची लागण होत आहे.
...........
२० टक्के मुलांची कोरोना चाचणी
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बालरोग विभागाच्या ओपीडीमध्ये सध्या दररोज ७० ते ८० बालकांची तपासणी केली जात आहे.
- ज्या बालकांना चार ते पाच दिवसांपेक्षा अधिक दिवस ताप असेल आणि इतर लक्षणे असल्यास त्या बालकांची कोरोना चाचणी केली जात आहे.
- सरासरी २० टक्के बालकांची कोरोना चाचणी केली जात असून यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण नगण्य आहे.
...................
डेंग्यू, मलेरियाची चाचणी
जिल्ह्यात डेंग्यू आणि मलेरियाची सुद्धा साथ सुरू आहे. बालकांना सुद्धा डेंग्यू आणि मलेरियाची लागण झाली असल्याचे चाचणीनंतर पुढे येत आहे. त्यामुळे या दोन्ही आजारांच्या अनुषंगाने लक्षणे दिसतात. या बालकांची मलेरिया आणि डेंग्यूची चाचणी केली जात आहे.
............
ही घ्या काळजी
- तीन दिवसांपेक्षा अधिक काळ ताप, सर्दी, खोकला असल्यास आपल्या जवळच्या डाॅक्टरांचा सल्ला घ्या.
- लहान मुलांचे खाण-पानावर लक्ष ठेवा, जेवण कमी झाल्यास डॉक्टरांना वेळीच दाखवा.
- डासांचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची काळजी घ्या, डासनाशक फवारणी करून घ्या.
..................
कोट
पावसाळ्याच्या दिवसांत साधारणपणे व्हायरल फिव्हरच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असते. त्यामुळे या कालावधीत लहान बालकांना अधिक जपण्याची गरज आहे. ताप आल्यास त्वरित डॉक्टरकडे जाऊन उपचार करून घ्या.
- डॉ. सुनील देशमुख, बालरोगतज्ज्ञ
..............
लहान मुलांना तीन-चार दिवसांपेक्षा अधिक दिवस ताप असल्यास वेळीच आपल्या जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधून उपचार करून घ्या, घरातील मोठ्यांना सर्दी, खोकला, ताप असल्यास त्यांनी लहान मुलांच्या संपर्कात येणे टाळावे.
-डॉ. प्रदीप गुजर, बालरोगतज्ज्ञ