मिरची मसाल्यांना बसतोय भाववाढीचा तडाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:28 AM2021-03-21T04:28:01+5:302021-03-21T04:28:01+5:30

गोंदिया : पेट्रोल, डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने जीवनावश्यक वस्तूसह भाजीपाला, गॅस सिलिंडरचे दर वाढल्याने सर्वसामान्यांचे बजेट बिघडले, ...

Chili spices are hitting the price rise | मिरची मसाल्यांना बसतोय भाववाढीचा तडाका

मिरची मसाल्यांना बसतोय भाववाढीचा तडाका

Next

गोंदिया : पेट्रोल, डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने जीवनावश्यक वस्तूसह भाजीपाला, गॅस सिलिंडरचे दर वाढल्याने सर्वसामान्यांचे बजेट बिघडले, तर महिन्याचा खर्च करताना गृहीणींनासुद्धा चांगलीच तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यातच मिरची मसाल्यांचे भाव वाढल्याने भाववाढीचा तडका बसल्याचे चित्र आहे. मसाल्यांचे नाव घेताच चविष्ट व्यंजनाची आठवण येते. उन्हाळ्याची चाहूल लागताच मिरची-मसाल्याचे दर वाढले आहे. दरवर्षीच दरवाढ होते; मात्र कोरोना काळातही या पदार्थांमध्ये दरवाढ झाल्याचे दिसून येते. कुठलीही भाजी असो त्यात स्वादानुसार, मसाले घातले जातात. शाकाहार असो की अन्य श्रेणीतील व्यंजन एकही मसाल्याची वस्तू कमी पडली की भाजीची चव बिघडतेच. गोंदिया शहरातील बाजारपेठेत मसाल्यांची आवक चांगल्या प्रमाणात आहेत. मसाल्याचा दर किलोमागे ५० ते १७० रुपये पर्यंत दरवाढ झाल्याचे दिसून आले. कोरोना संकटकाळात बहुतांश आस्थापने बंद असल्याने मालाची आवक पाहिजे त्या प्रमाणात विक्री झाली नाही. उत्पादनही व पुरवठाही कमी प्रमाणात झाला. आता कालांतराने यात वाढ झाली असून, हंगामाच्या तोंडावर मिरची व मसाल्यांच्या किमतीत वाढ झाल्याचे दिसून येते. सर्वसामान्यांचे आर्थिक बजेटही बिघडले आहे.

..........

केशोरी आणि नागपूर येथून येते मिरची

गोंदिया जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. केशोरीची मिरची अख्या जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. तरीही जिल्ह्याची आवश्यकता लक्षात घेता, लाल मिरची ही नागपुरातून निर्यात केली जाते. नागपूर बाजारातील कॉटन मार्केटसह अन्य ठिकाणांहूनही मिरची जिल्ह्यात आणली जाते. जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रातूनही मिरचीचा पुरवठा केला जातो. याला मोठा ग्राहकवर्गही आहे.

.......

किचनमधील महत्त्वाचे व दररोज उपयोगात येत असलेल्या मसाल्यांचे दरही भरपूर वाढले आहेत. लग्नसराई व उन्हाळ्याची चाहूल लागताच ही दरवाढ निश्चित असते; पण मागील वर्षी यंदाची दरवाढ मोठ्या प्रमाणात झाली आहे. याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. यात उत्पादकांना कमी लाभ, तर व्यापाऱ्यांना अधिक लाभ मिळतो.

- वैशाली कोहपरे, गृहिणी

........

स्वयंपाक घरातील महत्वाचे घटक म्हणजे मिरची व मसाले. या साहित्यांचे दर वाढले तर त्याचा फटका बसणारच. अत्यावश्यक असलेले हे साहित्य बाजारपेठेत उपलब्ध असतातच, पण त्यात ऐन लग्नसराईच्या हंगामात झालेली दरवाढ दिलासा देणारी नसतेच. आवश्यक बाब असल्याने किमान या साहित्यांच्या भाव आटोक्यात हवे.

- प्रिया हरडे, गृहिणी,

.....

Web Title: Chili spices are hitting the price rise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.