शिक्षकांच्या मागणीसाठी चिमुकल्यांची पंचायत समितीवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 10:57 PM2019-07-22T22:57:36+5:302019-07-22T22:58:21+5:30

शिक्षण आमचा मुलभूत अधिकार आहे. तो आम्हाला मिळायलाच पाहिजे. शाळेत शिक्षक नाहीत, जीर्ण वर्गखोल्यात शिक्षण घ्यावे लागते. शासन प्रशासन आमच्या जीवावर उठले आहेत. वर्गखोल्या द्या अशी वारंवार मागणी करुनही शासन व प्रशासनाला पाझर फुटत नाही या मागण्यांसाठी ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीने सोमवारी पंचायत समिती कार्यालयावर येऊन धडकली.

Chimukalis hit Panchayat Samiti for demand of teachers | शिक्षकांच्या मागणीसाठी चिमुकल्यांची पंचायत समितीवर धडक

शिक्षकांच्या मागणीसाठी चिमुकल्यांची पंचायत समितीवर धडक

Next
ठळक मुद्देग्रामस्थांनी शाळेला ठोकले कुलूप : आश्वासनानंतर आंदोलन मागे

लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : शिक्षण आमचा मुलभूत अधिकार आहे. तो आम्हाला मिळायलाच पाहिजे. शाळेत शिक्षक नाहीत, जीर्ण वर्गखोल्यात शिक्षण घ्यावे लागते. शासन प्रशासन आमच्या जीवावर उठले आहेत. वर्गखोल्या द्या अशी वारंवार मागणी करुनही शासन व प्रशासनाला पाझर फुटत नाही या मागण्यांसाठी ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीने सोमवारी पंचायत समिती कार्यालयावर येऊन धडकली. भर उन्हात चिमुकल्यांनी तब्बल साडे तीन तास ठिय्या मांडला. लेखी आश्वासनानंतर या आंदोलनाची सांगता झाली.
मोरगाव येथील जि.प.प्राथमिक शाळेत १ ते ८ वर्ग असून एकूण पटसंख्या १७४ आहे.आठ वर्गासाठी केवळ पाच शिक्षक आहेत. हा प्रकार मागील तीन वर्षापासून आहे.शाळा आहे पण शिक्षण मिळत नाही, शालेय स्तरावरुन मागणी व पाठपुरावा केला जातो,मात्र याकडे कानाडोळा केला जातो, शिक्षणाच्या कायद्यांतर्गत प्रत्येकाला शिक्षण मिळण्याचा मुलभूत अधिकार आहे. शाळाबाह्य मुले राहू नयेत, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. मात्र भौतिक व मुलभूत सुविधा उपलब्ध केल्या जात नाही. असे विदारक चित्र जि.प.च्या शाळांमध्ये बघावयास मिळते, याचीच अनुभूती मोरगाववासीयांना आली. त्यामुळे शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी सोमवारी सकाळी ११ वाजता शाळेला कुलप ठोकले.दोन शिक्षक व दोन वर्गखोल्यांचा गंभीर विषय घेऊन शाळेचे विद्यार्थी-विद्यार्र्थिनी तीन कि.मी पायपीट करीत पंचायत समिती कार्यालयावर येऊन धडकले.
या वेळी शिक्षणाच्या अधिकारासंदर्भातील बोलकी फलके विद्यार्थ्याच्या हातात होती. शिक्षण आमचा मुलभूत अधिकार आहे तो आम्हाला मिळायलाच पाहिजे, अशी आर्त हाक देत पंचायत समिती कार्यालयाच्या पटांगणात विद्यार्थी पोहोचले. १९५६ ची जुनाट इमारत आहे. ती पडक्या अवस्थेत आहे. त्यामुळे कधीही दुर्घटना होण्याची शक्यता आहे. वगखोलीच्या कमतरतेमुळे एका खोलीत दोन वर्ग अथवा व्हरांड्यात वर्ग भरविले जातात. त्यामुळे शिक्षण कमी व गोंधळच अधिक होतो. दोन शिक्षकांची कमतरता असल्यामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होते.शालेय परिसरात क्रीडांगणाची जागा नाही. जिथे जागा आहे त्यावर अतिक्रमण झाले असून ते शाळेपासून तीन किमी अंतरावर आहे.शालेय परिसरात एक पडक्या अवस्थेतील समाज मंदिर आहे. ते कुठल्याही कामाचे राहीले नाही. मोडकळीस आलेले हे समाज मंदिर जमीनदोस्त करुन त्याठिकाणी नव्याने बांधकाम होणे गरजेचे आहे.या बाबी ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिल्या. या आंदोलनाच्या शिष्टमंडळात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुनेश्वर शहारे, तानाजी लोधी, हेमंत लाडे, नरेंद्र लाडे, दयाराम सोनवाने, वैशाली गोबाडे, लता शहारे, ऋषी कोवे, क्षिरसागर लाडे, मनिषा शहारे, रमेश लाडे, देवराम पर्वते, वासुदेव चचाणे यांचा सहभाग होता.
पदवीधर शिक्षकांची पदे रिक्त
जि.प.च्या वर्ग ६ ते ८ पर्यंतच्या शाळांना पदवीधर शिक्षकांची आवश्यकता असते. जिल्ह्याभरात विज्ञान पदवीधर शिक्षक नाहीत. मोरगाव येथे कला व विज्ञान शाखेच्या पदवीधर शिक्षकांची आवश्यकता आहे. विज्ञान पदवीधर शिक्षक नसतांनाही विज्ञान विषय कला शाखेच्या पदवीधर शिक्षकाकडून शिकविली जातात. हे अत्यंत दुर्भाग्यपूर्ण आहे.त्यामुळे गुणवत्ता कशी असेल याची खात्री पटते. शासनस्तरावरुन यासंदर्भात पाऊले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
चर्चेनंतर आंदोलन मागे
पंचायत समिती सभापती अरविंद शिवणकर, उपसभापती करुणा नांदगावे, प्रभागी गट विकास अधिकारी मयुर आंदेलवाड व गटशिक्षणाधिकारी एन.जे.शिरसाटे यांचेशी ग्रामस्थांनी चर्चा केली. २५ जुलैला पंचायत समिती मासीक सभा आहे.या सभेत सदस्यांशी चर्चा करुन नवीन शिक्षकांची शैक्षणिक कार्यासाठी मोरगाव येथे व्यवस्था करण्यात येईल. इतर शाळेत शिक्षक अतिरीक्त झाल्यास दुसºया शिक्षकाचीही व्यवस्था केली जाईल.तसेच दोन वर्गखोल्या जीर्ण असल्याचा प्रस्ताव जि.प.कडे ८ जुलै रोजी पाठविण्यात आला आहे.यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा करण्याचे लेखी पत्र शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांना देण्यात आले.त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

Web Title: Chimukalis hit Panchayat Samiti for demand of teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.