चिमुकल्यांचा सुटीचा मूड कायम; अभ्यासाचा पडला विसर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:20 AM2021-07-11T04:20:32+5:302021-07-11T04:20:32+5:30
गोंदिया : कोरोनाच्या संसर्गामुळे मागील दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाइन शिक्षण सुरू ...
गोंदिया : कोरोनाच्या संसर्गामुळे मागील दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. मात्र, ऑनलाइन शिक्षणाचा फारसा प्रभाव विद्यार्थ्यांवर होत नसून त्यांची अभ्यासातील रुची कमी होत चालली आहे. दीड वर्षापासून शाळेत जाणे बंद असल्याने विद्यार्थी घरीच आहे. त्यामुळे चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा अद्यापही सुटीचा मूड कायम असून, त्यांना अभ्यासाचासुद्धा विसर पडत असल्याचे चित्र आहे. मात्र, हे सर्वच विद्यार्थ्यांच्या बाबतीत लागू होत नसून, अजूनही बऱ्याच विद्यार्थ्यांची शाळेत जाण्याची ओढ कायम आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाइन शिक्षण सुरू असले तरी याचा फारसा विद्यार्थ्यांवर परिणाम होत असल्याचे दिसून येत नाही. उलट तीन ते चार तास मोबाईलवर ऑनलाइन क्लासेसमुळे अभ्यासप्रती त्यांची रुची कमी होत आहे, तर चौथीपर्यंतचे विद्यार्थी स्वत:हून अभ्यास करण्यासाठी तयार होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पालकांनासुद्धा आता या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची चिंता सतावत आहे.
...........
पालकांनी घरात घ्यावी शाळा
- शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांची अभ्यासातील रुची कमी होऊ नये यासाठी त्यांचा नियमित गृहपाठ घ्यावा.
- विद्यार्थ्यांना फावल्या वेळेत मोबाईल, टीव्ही अधिक वेळ पाहू न देता त्यांना गोष्टीची पुस्तके वाचण्याकरिता द्यावी.
- त्यांचे अभ्यासात मन लागेल यासाठी घरातील वातावरण अनुकूल ठेवावे
- शाळेच्या वेळेत त्यांना नियमित अभ्यास करण्याची सवय लावावी.
...................
पालकांची अडचण वेगळीच
शाळा बंद असल्याने मागील दीड वर्षांपासून मुले घरीच आहे. दिवसभर घरात राहून ती चिडचिडी आणि मस्तीखोर झाली आहेत. अभ्यासदेखील करण्यास टाळटाळ करतात. त्यामुळे कधी एकदाची शाळा सुरू होते याची वाट पाहत आहेत.
- कविता शिवणकर, पालक
..........
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाइन शिक्षण सुरू असले तरी शिक्षकांचा धाक यामुळे विद्यार्थ्यांना राहिला नाही. त्यामुळे अभ्यास करण्यासाठी टाळटाळ करतात. घरच्या घरी राहून मुले चिडचिडी झाली आहेत.
- श्वेता मस्के, पालक.
...............
अभ्यास टाळण्यासाठी अनेक कारणे
- ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना शिक्षकांचा पाहिजे तसा धाक आणि भीती राहिली नाही. त्यामुळे ते अभ्यास करण्यासाठी टाळटाळ करतात.
- सतत ऑनलाईन क्लासेस करून माझे डोक व डोळे दुखत आहे असे बहाणे करतात.
- आज सरांनी गृहपाठच दिला नाही अशी खोटी कारणे सांगून अभ्यास करण्यासाठी टाळटाळ करतात.
- आज ऑनलाइन क्लास करण्याचा मूड नाही, माझे पोट दुखत आहे असे बहाणे करतात.
- शाळा बंद आहे त्या केव्हा सुरू होतील याची हमी नाही, मग अभ्यास करून काय करू
- शाळेत न जाताच विद्यार्थी वरच्या वर्गात गेले या गोष्टींचासुद्धा परिणाम त्यांच्या अभ्यासावर झाला.
...................,
मुलांना होईना अक्षर ओळख
- दीड वर्षांपासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांची अभ्यासाची सवय मोडली आहे. त्यामुळे पाठांतर वगैरे बंद असल्याने त्यांना अक्षरओळख सुद्धा राहिली नाही.
- शाळेसारखा गृहपाठ नियमित होत नसल्याने बऱ्याच विद्यार्थ्यांना मुखपाठ असलेल्या गोष्टी आता ते विसरत चालले आहे.
- बाराखडी, एबीसीडी, छोट्या गोष्टी यांचासुद्धा विसर विद्यार्थ्यांना पडत असल्याचे चित्र आहे.