शाळेच्या दारातच सुरू आहे सिगारेट अन् तंबाखूचे विक्री; विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 04:35 PM2024-09-30T16:35:22+5:302024-09-30T16:36:28+5:30
आठवडाभरात ५० जणांना दंड: शहर पोलिसांच्या कारवाईने तंबाखू विक्रेत्यांचे धाबे दणाणले
नरेश रहिले
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शाळा-महाविद्यालय आणि शासकीय कार्यालयाच्या १०० मीटरच्या परिसरात गुटखा, तंबाखू, सिगारेटसह इतर तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे. असे असतानाही अगदी जिल्हा परिषद शाळेपासून ते महाविद्यालयापर्यंत सर्वत्रच गुटखा खुलेआम विक्री केला जात आहे. यामुळे शालेय मुले व्यसनाच्या आहारी जात आहेत. या तंबाखू विक्री करणाऱ्या पानटपरी व दुकानदारांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. शहर पोलिसांनी आठवडाभरात सर्वाधिक कारवाया केल्या असून, ५० पानटपरी चालकांना प्रत्येकी २०० रुपये दंड आकारला आहे.
शाळेच्या परिसरात गुटखा विक्री होत असताना पालक, मुख्याध्यापक, शिक्षकांनीही याकडे लक्ष देऊन ते बंद होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. गुटखा व इतर तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यास बंदी आहे. त्यातही शाळा महाविद्यालय आणि शासकीय कार्यालयांसह इतर ठिकाणी १०० मीटरच्या आत कोणी अशाप्रकारचे तंबाखूजन्य पदार्थ विक्री करत असतील त्यांच्याविरोधात पोलिसांकडून कारवाई केली जाते. आतापर्यंत जिल्ह्यात विशेष मोहीम राबवून एकदाही कारवाया केल्या नव्हत्या, परंतु पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांनी यात शिक्षा कमी असली, तर कारवायांसाठी सर्वच ठाणेदारांना सूचना केल्या. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व पोलिस यंत्रणा कारवाया करण्यासाठी कामाला लागल्या आहेत.
शहरात ठाणेदार किशोर पर्वते यांच्या मार्गदर्शनात पोलिस हवालदार कवलपालसिंह भाटिया, जागेश्वर उईके, निशिकांत लोंदासे, सुदेश टेंभरे, दीपक रहांगडाले, सतीश शेंडे, प्रमोद चव्हाण, दिनेश बिसेन, कुणाल बारेवार, विक्की रावते, सुभाष सोनवाने व अशोक रहांगडाले यांनी कारवाया केल्या आहेत.
२०० रुपये दंडापासून ते पाच वर्षांपर्यंत शिक्षा
- सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने (जाहिरातीस प्रतिबंध आणि व्यापार व वाणिज्य व्यवहार आणि उत्पादन, पुरवठा व वितरण यांचे विनियमन) अधिनियम, २००३ नुसार पोलिसांकडून कारवाया केल्या जात आहेत.
- यामध्ये २०० रुपये दंडापासून ते पाच वर्षे कारावासापर्यंत शिक्षेची तरतूद आहे. पहिल्यांदा गुन्हा केल्यास कमी आणि नंतर त्यात पुन्हा-पुन्हा वाढ होत असेल तर कठोर कारवाई केली जात असल्याचे सांगण्यात आले.
काही गुरुजींना व्यसन...
शाळा-महाविद्यालयांमधील काही शिक्षक, प्राध्यापक आदींनाच सिगारेट, गुटखा, तंबाखूचे व्यसन जडले आहे. त्यामुळे त्यांच्याकडूनही शाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्यांना अभय मिळत आहे. मात्र, याचा परिणाम विद्यार्थ्यांवर होत असून मुले अल्पवयीन असतानाच व्यसनी बनू लागले आहेत. त्यामुळे व्यसन करणाऱ्या शिक्षकांचीही चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
शाळेचे मुख्याध्यापक, प्राचार्यांचीही जबाबदारी
शाळा-महाविद्यालयाच्या १०० मीटरच्या परिसरात तंबाखू, गुटखा, सिगारेटसह इतर तंबाखूजन्य पदार्थ कोणी विक्री करत असेल, तर त्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी पालक, मुख्याध्यापक आणि प्राचार्याचीही आहे. थेट विक्रेत्याला बोलण्या- ऐवजी पोलिसांची मदत घेऊन कारवाई केल्यास भविष्यात मुले व्यसनी होणार नाहीत. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज आहे.
पाच दिवसः ५० कारवाया
शहर पोलिसांनी २३ सप्टेंबर रोजी ७, २४ सप्टेंबर रोजी १०, २६ सप्टेंबर रोजी ११, २८ सप्टेंबर रोजी १७ व २९ सप्टेंबर रोजी ६ अशा एकूण ५० कारवाया या पाच दिवसांत केल्या आहेत. जिल्हाभरात कारवायांची मोहीम हाती घेण्यात आली आहे. यामध्ये टपरी, हॉटेल्स आदी ठिकाणी धाड मारण्यात आली आहे.
"शाळा व्यवस्थापनाने जागरूक व्हावे गुटख्यासह इतर साहित्य जप्त केल्यानंतर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अशाच कारवायांच्या मोहीम आणि सातत्य यापुढेही ठेवावे. आता तरी शाळा व्यवस्थापनासह पालकांनी जागरूक होण्याची गरज आहे."
- नीलेश चुटे, सामाजिक कार्यकर्ता गोंदिया