तहसील कार्यालयात नागरिकांचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 11:57 PM2017-11-07T23:57:13+5:302017-11-07T23:57:25+5:30
गोंदिया तालुक्यातील धामनेवाडा (एकोडी) येथे ग्राम पंचायतीच्या निवडणुकीेत विजयी उमेदवारास पराभूत व पराभूत उमेदवाराला विजयी दाखविल्याच्या प्रकरणावरुन मंगळवारी गोंदिया तहसील कार्यालयात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
काचेवानी : गोंदिया तालुक्यातील धामनेवाडा (एकोडी) येथे ग्राम पंचायतीच्या निवडणुकीेत विजयी उमेदवारास पराभूत व पराभूत उमेदवाराला विजयी दाखविल्याच्या प्रकरणावरुन मंगळवारी गोंदिया तहसील कार्यालयात उमेदवारांसहीत शेकडो महिला-पुरुषांनी ठिय्या आंदोलन केले. मात्र तहसीलदार सुट्टीवर गेल्याने गावकºयांत रोष दिसून आला.
नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल १७ आक्टोबर रोजी जाहीर झाले. यात महेंद्रकुमार भदाडे व मालता कोकुडे यांना विजयी घोषित करण्यात आले होते. मात्र जिल्हाधिकाºयांनी ४ नोव्हेंबर रोजी पाठविलेल्या विजयी उमेदवारांच्या यादीत पराभूत झालेल्या दिक्षा ईळपाते व मदन रहांगडाले यांचे नाव असल्याने गावातील जनतेचा आक्रोश वाढला आहे.
गावातील विजयी उमेदवार महेंद्र भदाडे व मालता कोकुडे सहित प्रमुख नागरिकांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार व पोलीस ठाण्यात न्याय देण्यासंबंधी निवेदन दिले. मंगळवारी तहसीलदार व जिल्हाधिकाºयांची भेट घेण्याकरिता गोंदिया येथे शेकडो गावकरी आले. तहसीलदार तीन दिवसांच्या सुटीवर गेल्याने सर्व गावकरी संतापले व त्यांच्या कार्यालयात ठिय्या मांडला. विशेष म्हणजे, धामनेवाडाचे प्रकरण गंभीर असतानाही तहसीलदार सुटीवर गेल्याने प्रकरणाला घेऊन विविध प्रकारच्या शंका-कुशंकांना पेव फुटत आहे.
वादाच्या भूमिकेत नाही, न्याय द्या
गावातील दोन्ही पक्षात वादंग नाही. बहुमत असलेल्या पक्षाकडून सुद्धा १७ तारखेच्या निकालात महेंद्र आणि मालता विजयी झाल्याचे मान्य करण्यात आले. यादीमध्ये झालेली चूक किंवा जाणून करण्यात आलेली चूक तत्काळ जिल्हाधिकाºयांनी दुरूस्त करावी. जे सत्य आहे ते ई.व्ही.एम. मशीनद्वारे खुलासा करुन दयावे. आम्हाला कसलाही वाद करुन गावाची शांतता भंग करायची नाही असे भदाडे व कोकुडे सहीत शेकडो गावकºयांनी सांगितले आहे.