ग्रामपंचायतविरूद्ध नागरिक
By Admin | Published: December 31, 2015 01:51 AM2015-12-31T01:51:45+5:302015-12-31T01:51:45+5:30
स्थानिक ग्रामपंचायतच्या अनागोंदी कारभाराने त्रस्त झालेल्या नागरिकांनी मासिक सभेचे अवलोकन करण्यासाठी मासिक सभेत ...
नवेगावबांध : स्थानिक ग्रामपंचायतच्या अनागोंदी कारभाराने त्रस्त झालेल्या नागरिकांनी मासिक सभेचे अवलोकन करण्यासाठी मासिक सभेत उपस्थित राहण्याची परवानगी मिळविण्यासाठी मागील दोन महिन्यापासून ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज सादर केलेत. परंतु एकूण सतरा सदस्यांपैकी अकरा सदस्यांनी यावर आक्षेप घेतला. त्यामुळे नागरिकविरूध्द ग्रामपंचायत सदस्य, असे शीतयुध्द नवेगावबांध येथे सुरू असल्याचे बोलले जात आहे.
मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५९ च्या कलम १५/१ अन्वये ग्रामपंचायतच्या मासिक सभेचे कामकाज लोकाभिमुख व पारदर्शक व्हावे यासाठी मासिक सभेचे अवलोकन करण्यासाठी अर्ज करणाऱ्या स्थानिक नागरिकांना परवानगी देण्यात यावी, असे नमूद आहे. तसेच नियम ६/२ अन्वये ग्रामपंचायतची सभा ग्रामपंचायत कार्यालय, सभागृह किंवा चावडीतसुध्दा भरविण्यात आली पाहिजे, असेही नमूद आहे. मासिक सभेच्या अवलोकनार्थ काही नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयात मागील दोन महिन्यापूर्वी अर्ज सादर केले. त्यासोबतच अधिनियमाची झेरॉक्स प्रतदेखील जोडण्यात आली. परंतु अकरा सदस्यांनी या अर्जावर आक्षेप घेतला. हे आपल्या अधिकारावर अतिक्रमण असल्याचे सांगून २१ डिसेंबरच्या मासिक सभेतून काढता पाय घेतला. सदर अधिनियमाची ग्रामविस्तार अधिकाऱ्यांनी माहिती देऊनसुध्दा हे सदस्य मानायलाच तयार नाहीत. उलट सरपंचावर अविश्वास आणण्याची धमकी देत असल्याचे वृत्त आहे.
मासिक सभेमध्ये नागरिकांच्या विविध कामांना मंजुरी देणे, नाहरकत प्रमाणपत्र, संपत्तीचे फेरफार, घर टॅक्स लावणे, विकास कामांचे नियोजन, आरोग्याशी निगडीत असलेले ठराव आदी कामे मंजूर करण्यात येतात. परंतु सभेत काही मोजक्या लोकांचीच कामे केली जातात व इतरांची अकारण अडवणूक केली जाते, असा नागरिकांचा आक्षेप आहे. यासाठी नागरिकांनी अधिनियमाचे शस्त्र उगारले. परंतु यामुळे मात्र काही सदस्यांच्या पोटात दुखू लागले आहे. याचे कारण मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे. सदस्यांच्या वशिलेबाजीने कामे होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
यामुळे सदस्य विरूध्द नागरिक असे शीतयुध्द सुरू झाले आहे. यावर कोणती उपाययोजना केली जाते, याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)