चिखली येथील नागरिक चार दिवसांपासून पाण्यासाठी व्याकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:21 AM2021-06-26T04:21:12+5:302021-06-26T04:21:12+5:30
सडक-अर्जुनी : गट ग्रामपंचायत चिखली व कोहळीटोलाचे मिळून ४ लाख ६७ हजार ६० रुपये वीज बिल थकल्याने महावितरणने नळपाणी ...
सडक-अर्जुनी : गट ग्रामपंचायत चिखली व कोहळीटोलाचे मिळून ४ लाख ६७ हजार ६० रुपये वीज बिल थकल्याने महावितरणने नळपाणी पुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे. परिणामी, नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे.
चिखली गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या चिखली, कोहळीटोला या गावांचा पाणीपुरवठा बंद झाला असल्याने तोंडचे पाणी पळाले आहे. नियमित पाणी बिल भरणाऱ्या सर्वसामान्य नळधारक ग्राहकांना त्याचा चांगलाच फटका बसत आहे. सध्या पाण्यासाठी बोअरवेलवर गर्दी असते. पाणी नळाला केव्हाही येते किंवा येतच नाही. याकडे स्थानिक प्रशासनाचे पाणी वितरण व्यवस्थेकडे लक्ष असते काय किंवा नाही, हे देखील कळेनासे झाले आहे. दरम्यान वरिष्ठांनी लक्ष देऊन गावातील पाणी समस्या मार्गी लावावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
गट ग्रामपंचायत अंधारात
येथील गट ग्रामपंचायतीच्या पथदिव्यांचा विद्युत पुरवठा महावितरणने खंडित केला असून, संपूर्ण गाव अंधारात सापडले आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात साप, विंचू व कीटकांचा धोका नाकारता येत नाही.
‘वीज बिल भरणा न झाल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. थकबाकी वसुली करून लवकरच पाणीपुरवठा सुरू करण्यात येईल, चालू व थकीत पाणीपट्टीधारकांनी लवकरात लवकर पाणी कर ग्रामपंचातीमध्ये जमा करून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे.
-चित्रा भेंडारकर, सरपंच, चिखली.