कामठा मार्गासाठी नागरिकांचा एल्गार ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:18 AM2021-07-23T04:18:58+5:302021-07-23T04:18:58+5:30
आमगाव : येथील कामठा मार्गाची दयनीय अवस्था झाली असून, या रस्त्याच्या नवीनीकरणासाठी २५ गावांतील नागरिकांनी स्थापन केलेल्या कामठा मार्ग ...
आमगाव : येथील कामठा मार्गाची दयनीय अवस्था झाली असून, या रस्त्याच्या नवीनीकरणासाठी २५ गावांतील नागरिकांनी स्थापन केलेल्या कामठा मार्ग समितीने आंदोलन करीत मंत्र्यांचे फोटो घेऊन खड्ड्यात बसणार, असा इशारा दिला आहे.
आमगाव ते रावणवाडी रस्त्याची दुरवस्था झाली असून, जागोजागी खड्डे पडले आहेत. या रस्त्यावर अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे असून, अनेकांचा नाहक बळी गेला आहे. यामुळे त्यांच्या कुटुंबाचे छत्र हिरावले आहे. तसचे अनेकांना अपघातात शारीरिक अपंगत्व आले आहे. त्यामुळे अनेकदा आमदार-खासदार इतर राजकीय मंडळींना या रस्त्याची कल्पना देऊनसुद्धा रस्ता अद्याप तयार करण्यात आलेला नाही. याचे नुकसान सामान्य नागरिकांना भोगावे लागत असल्यामुळे या परिसरातील २५ गावांतील नागरिकांनी कामठा मार्ग संघर्ष समिती स्थापन केली असून, आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
यांतर्गत, गणेश मंदिर येथे घेण्यात आली असून, शुक्रवारी (दि. २३) तहसीलदारांमार्फत सार्वजनिक बांधकाममंत्र्यांना आंदोलनाविषयी निवेदन देण्याचे नागरिकांनी ठरविले आहे. तसेच २ ऑगस्ट रोजी निंबार्ते लॉनजवळील खड्ड्यात मंत्र्यांचे फोटो घेऊन डबक्यात बसून, आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जोपर्यंत रस्त्याचे काम सुरू होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, असेही बैठकीत ठरविण्यात आले आहे. यावेळी कामठा मार्ग संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.