नागरिकांनो, नि:संकोचपणे लसीकरणासाठी पुढे या ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:28 AM2021-05-10T04:28:35+5:302021-05-10T04:28:35+5:30
नवेगावबांध : सध्या सर्वत्र कोरोनाची दुसरी लाट आली आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातदेखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी ...
नवेगावबांध : सध्या सर्वत्र कोरोनाची दुसरी लाट आली आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातदेखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी लसीकरण हा रामबाण उपाय आहे. त्यामुळे नागरिकांनी मनात कुठलीही शंका न बाळगता लसीकरणासाठी नि:संकोचपणे पुढे यावे. तसेच आपल्या नजीकच्या लसीकरण केंद्रावर जाऊन प्रतिबंधात्मक लस घ्यावी, असे तहसीलदार विनोद मेश्राम यांनी कळविले आहे.
लस घेतल्यावर आरोग्याला कुठलाही धोका नाही, कुणीही लस घेऊन मरत नाही, कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता तालुक्यातील लसीकरण कार्याला सहकार्य करावे. तसेच स्वतःला, आपल्या कुटुंबीयांना आणि तालुक्याला कोरोना संसर्गापासून दूर ठेवावे. तालुक्यातील सर्व आरोग्यवर्धिनी केंद्र व उपकेंद्र, तसेच नवेगावबांध, अर्जुनी मोरगाव ग्रामीण रुग्णालयात आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जिवाचे रान करून लसीकरण कार्यक्रमात स्वतःला झोकून दिले आहे. सर्व लसीकरण केंद्रांवर लस देण्याचे कार्य सुरू आहे. नियमित लसीकरणाबरोबरच पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना दुसरा डोस देण्यास सध्या प्राधान्य दिले जात आहे. ज्या नागरिकांना कोविड प्रतिबंधक लस लावायची आहे त्यांनी १ दिवसापूर्वी सायंकाळी सहा वाजेनंतर दुसऱ्या दिवसाकरिता १ दिवसापूर्वी ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी कोविड कार्यपथकातील सदस्य, ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधावा किंवा http://www.selfregistration.cowin.gov.in या वेबसाइटवर जाऊन नोंदणी करावी व नंतर लसीकरणासाठी वेळ घ्यावी. लस घेतल्याने आपण सुरक्षित राहतो. त्यामुळे तालुक्यातील सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे व तालुका प्रशासनाला सहकार्य करावे, असे तहसीलदार विनोद मेश्राम यांनी कळविले आहे.