उघड्यावरील अन्नपदार्थांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
By admin | Published: August 19, 2014 11:48 PM2014-08-19T23:48:19+5:302014-08-19T23:48:19+5:30
ग्रामीण भागात बस स्थानक व शाळा परिसरात उघड्यावर खाद्यपदार्थ विकणे जोमात सुरू आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून पोटाचे विकास बळावले आहेत.
रावणवाडी : ग्रामीण भागात बस स्थानक व शाळा परिसरात उघड्यावर खाद्यपदार्थ विकणे जोमात सुरू आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून पोटाचे विकास बळावले आहेत.
ग्रामीण भागातील नागरिक ये-जा करण्यासाठी एसटीच्या बसेसचा वापर अधिक करतात. त्यामुळे बस थांब्याजवळ सतत नागरिकांची वर्दळ असते. तसेच शाळा-महाविद्यालय परिसरात अनेकांनी खाद्यपदार्थांची दुकाने थाटली आहेत. या भागात खाद्य पदार्थ विकण्यासाठी कुणाचाही विरोध नाही. हॉटेलपेक्षा खाद्य पदार्थ ठेल्यांवर स्वस्त मिळत असल्याने तेथे खाद्य पदार्थ खाणाऱ्यांची गर्दी असते. परंतु सर्व खाद्य पदार्थ उघड्यावर विकल्या जात असल्यामुळे त्यावर वाहनांची धूळ मोठ्या प्रमाणात साचत असते. वातावरणात आर्द्रता असल्याने त्या पदार्थांवर माशाही सतत घोंगावत असतात. या पदार्थांवर जाळी किंवा झाकन ठेवणे आवश्यक असते. परंतु याकडे कुणीच लक्ष देत नाही. परिणामी असे खाद्य पदार्थ सेवन केल्याने नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत.
ग्रामीण भागातील काही प्रमुख गावांमध्ये आरोग्य केंद्र, बँक, शाळा-महाविद्यालय, पशू वैद्यकीय रूग्णालय, महसूल विभागाचे कार्यालय, पोलीस ठाणे आदी शासकीय कार्यालये आहेत. नागरिक विविध कामासाठी तेथे ये-जा करतात. दुपारची वेळ झाली तर काहीतरी खाण्यावाचून त्यांच्याकडे पर्याय नसतो. पैशाअभावी हॉटेलचे चैन त्यांना परवडत नाही. त्यामुळे ते टपरीवरील अशा खाद्य पदार्थांचा आधार घेतात. समोसा, कचोरी, पाणीपुरी, भेल आदी उघड्यावरील पदार्थ सेवन केले जातात. परंतु या पदार्थांना एकही टपरीचालक झाकून ठेवत नाही. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर रूप धारण करीत आहे. ग्रामीण भागात सर्व शासकीय व खासगी रूग्णालयांजवळ नेहमीच रूग्णांची गर्दी दिसून येते.
यासाठी संबंधित प्रशासनाने काही नियम तयार करून त्यांचे काटेकोरपणे पालन करायला लावणे, उघड्यावरील खाद्य पदार्थांचे नमूणे वेळोवेळी तपासणे गरजेचे आहे. परंतु संबंधित प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने अशा विक्रेत्यांचे फावत आहे. (वार्ताहर)