पुलाच्या मागणीसाठी पिपरटोला, मरारटोला, धानोली गावातील नागरिक बसले उपोषणाला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 03:09 PM2024-08-13T15:09:19+5:302024-08-13T15:15:06+5:30
३० ते ४० वर्षे जुना असलेला पूल : पुलावर पाणी असल्याने अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणात पडतो खंड
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आमगाव तालुक्यात असलेल्या पिपरटोला, मरारटोला, धानोली या गावांना जोडणाऱ्या कुआढास मार्गावरील पूल ४० वर्षांपूर्वी तयार केलेला आहे. या पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्याच्या दिवसांत या परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.
आठ आठ दिवस या नाल्यावर पाणी असल्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. कामानिमित्त जाणारे मजूर व भाजीपाला विक्रीकरिता जाणाऱ्या मजुरांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. येथे नवीन पूल बांधण्याची मागणी अनेकदा करण्यात आली. पण त्याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे परिसरातील गावकऱ्यांनी सोमवारपासून (दि.१२) या पुलावरच उपोषणाला सुरुवात केली.
आमगाव तालुक्यात असलेल्या पिपरटोला, मरारटोला, धानोली या गावांना जोडणारा हा पूल कमी उंचीचा आहे. त्यामुळे थोडाही जोराचा पाऊस झाला की या पुलावरून पाणी वाहत असते. त्यामुळे परिसरातील गावकऱ्यांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटतो. तर गावकऱ्यांना २५ किमीचा फेरा मारून तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. त्यामुळे या कुआढास नाल्यावर पूल बांधण्याची मागणी करीत सोमवारपासून (दि.१२) उपोषणाला सुरुवात केली आहे.
आमगाव तालुका आणि सालेकसा तालुक्यालगतच असलेल्या धानोली, पिपरटोला, मरारटोला या गावांना जाण्याकरिता कुआढास नाला वाघ नदीच्या जवळ असल्याने ह्या नाल्यावर पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचते. त्यामुळे गेल्या ३० वर्षांपासून येथील नागरिकांना हा त्रास सहन करावा लागत आहे.
अनेक विद्यार्थ्यांना माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि उच्च शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी जाण्याकरिता ह्या नाल्यावर पाणी असल्याने अनेक दिवस शाळेत जाण्यापासून वंचित राहावे लागते. ये- जा करणाऱ्या नागरिकांना आणि मजुरांना तसेच लहान व्यावसायिकांना सुद्धा या नाल्यावर पाणी असल्यामुळे २५ किलोमीटरचा लांब फेरा करून तालुक्याच्या ठिकाणी ये-जा करावी लागते. त्यामुळे या मार्गावर पूल तयार करण्याची मागणी केली आहे.
प्रशासनाचे होतेय दुर्लक्ष
कुआढास मार्गावरील पूल तयार करण्याच्या मागणीसाठी यापूर्वी अनेकदा आंदोलन केले. पण त्याची शासन आणि प्रशासनाने दखल घेतली नाही. यालाच कंटाळून येथील शालेय विद्यार्थ्यांसह परिसरातील नागरिकांनी सोमवारपासून (दि.१२) आमरण उपोषण सुरू केले. जोपर्यंत शासन पुलाची मागणी पूर्ण करीत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा प्रहार संघटना व येथील नागरिकांनी दिला आहे.