आॅईल प्लॉन्टला नागरिकांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 09:37 PM2018-08-12T21:37:25+5:302018-08-12T21:38:03+5:30
तालुक्यातील ग्राम पाऊलदौना ग्रामपंचायतच्या हद्दीत पांढरी गावाजवळ एका शेतात आॅईल प्लांट सुरु करण्यासाठी बांधकाम सुरु झाले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांनी प्रदूषणाची भिती व्यक्त करीत या आईल प्लांट स्थापित करण्याला विरोध केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : तालुक्यातील ग्राम पाऊलदौना ग्रामपंचायतच्या हद्दीत पांढरी गावाजवळ एका शेतात आॅईल प्लांट सुरु करण्यासाठी बांधकाम सुरु झाले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांनी प्रदूषणाची भिती व्यक्त करीत या आईल प्लांट स्थापित करण्याला विरोध केला आहे.
मागील काही दिवसांपासून पांढरी गावाजवळ बांधकाम सुरु असता या परिसरातील नागरिकांना हे माहितीच नाही की कशाचे बांधकाम सुरु आहे. जेव्हा गावातील काही सुज्ञ लोकांनी इंटरनेटवर माहिती काढली तेव्हा असे लक्षात आले की, छत्तीसगड राज्यातील एका मोठ्या उद्योगपतीच्या माध्यमातून येथे गजानन पॅरा प्रॉडक्ट पॅरालिसेस प्लांट या नावाने आॅईल प्लांट सुरु करण्यासाठी सदर बांधकाम केले जात आहे.
तेव्हा गावातील नागरिक हडबडून जागे झाले व त्यांनी ग्रामपंचायतशी संपर्क साधला असता ग्रामपंचायत मधून कोणतेही नाहरकत प्रमाणपत्र घेतले नाही असे कळले. तसचे तालुका स्तरावर महसूल विभागाची सुद्धा कोणतिही परवानगी घेतली नाही. आॅईल प्लांट पांढरी गावाजवळ सुरु झाल्यास या परिसरातील जवळपास २० किमी क्षेत्रापर्यंत वायू प्रदूषणाचा फटका बसेल. हे वायू प्रदूषण मनुष्यांनाच नाही तर पशू आणि शेतीला सुद्धा घातक ठरणार आहे. या प्लांटमध्ये सुमारे ५०० सेटींग्रेट पर्यंत टायर जाळून आॅईल तयार केले जाईल. टायर जाळताना येथून विषारी गॅस उत्सर्जित होणार असल्याचे काही जानकार लोक सांगत आहे.
त्यामुळे परिसरातील लोकांच्या जीवनावर मोठा परिणाम पडणार आहे. या प्लांटमुळे या परिसरातील पांढरी, पाऊलदौना, सोनपुरी, पाथरी, खेडेपार, रामाटोला इत्यादी गावांना प्रदूषणाच्या जबरदस्त फटका बसणार असल्याची शंका वर्तविली जात आहे. त्यामुळे या गावातील लोकांमध्ये दहशत पसरलेली आहे.
या बाबी लक्षात घेत या ग्रामपंचायतींनी प्लांटला विरोध करण्याचा ठराव घेतला. तसेच गावकऱ्यांनी तहसीलदार प्रशांत सांगळे, ठाणेदार राजकुमार डुणगे व इतर संबंधीत अधिकाºयांची भेट घेऊन आपली चिंता व्यक्त केली आहे. सदर प्लांट गावाजवळ स्थापित न करता गावापासून आवश्यक त्या अंतरापर्यत दूरवर स्थापित करण्यात यावे, अशी मागणी सुध्दा गावकऱ्यांनी केली आहे.
या प्लांटबाबत पर्यावरण नियंत्रक मंडळाची सुद्धा परवानगी घेण्यात आली की नाही. याबाबत कोणालाच माहिती नाही. ग्रामपंचायतकडे नाहरकत प्रमाणपत्रासाठी आवेदन केल्याचे बोलले जात आहे. परंतु याबद्दल गावकऱ्यांना खरी माहिती दिली जात नाही, असे बोलले जात आहे. यापुढे प्रशासन कोणते पाऊल उचलते हे बघावे लागेल.
महिला बचतगटाने केला विरोध
या परिसरातील बचतगटांच्याही महिला प्लांटला विरोध करण्यासाठी सरसावल्या असून जर हे प्रदूषण वाढविणारे प्लांट सुरु झाले तर आंदोलन उभारुन निषेध केला जाईल, अशा इशारा दिला आहे.
ज्या ठिकाणी प्लांट लावण्याचे बोलले जात आहे. तिथे सध्या भिंतीचे काम सुरु असून या ठिकाणी नेकमे कशाचे बांधकाम होणार आहे. याबाबत लेखी पुरावे प्राप्त झाले नाही. तरी सुद्धा महसूल विभाग यावर नजर ठेवून आहे. विना परवानगी कोणतेही बांधकाम केले जाऊ देणार नाही.
प्रशांत सांगळे, तहसीलदार, सालेकसा.
ग्रामपंचायतला नाहरकत प्रमाणपत्रासाठी आवेदन मिळाले आहे. परंतु आतापर्यंत प्लांटबद्दल पूर्ण माहिती स्पष्ट झाली नसून नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आले नाही.
ढोमणे, ग्रामसेवक,
ग्रा.पं.पाऊलदौना.