भूमिगत पुलाला नागरिकांचा विरोध
By Admin | Published: September 19, 2016 12:32 AM2016-09-19T00:32:17+5:302016-09-19T00:32:17+5:30
सिंदीपार रेल्वे लाईनवर भूमिगत रेल्वे पुलियाला नागरिकांनी विरोध केलेला असून या ठिकाणाहून परिसरातील
सिंदीपारच्या नागरिकांचे आंदोलन : १५ गावांतील वाटसरु मागतात रेल्वे गेट
सडक-अर्जुनी : सिंदीपार रेल्वे लाईनवर भूमिगत रेल्वे पुलियाला नागरिकांनी विरोध केलेला असून या ठिकाणाहून परिसरातील १५ गावे रहदारी करीत असल्याने मानवजागृत गेट तयार करण्याची मागणी केलेली आहे. अन्यथा जनआंदोलन करू असा ईशारा रेल्वे प्रशासनाला दिला आहे.
प्राप्त माहितीनुसार भूमिगत रेल्वे पुलियाचे बांधकामाकरीता सिंदीपार रेल्वे लाईनवर कंत्राटदाराचे लोकांनी तंबू तानून काम सुरू करण्याचा प्रयत्न केला असता त्या परिसरातील १५ गावांच्या लोकांनी त्याला विरोध करून काम थांबविला व बांधकामाचे साहित्य उचलून नेण्यास सांगितले. कंत्राटदाराशी भ्रमणध्वनीवरून संपर्क केला असता रेल्वे प्रशासन जो निर्णय घेऊ तो आपणास मान्य राहील असे आश्वासन कंत्राटदारांनी नागरिकांना दिले. तोपर्यंत काम सुरू करणार नाही. सदर रस्त्यावरून परिसरातील १५ गावातील जड वाहने, शाळेच्या बसेस आवागमन करीत असतात. सदर बांधकामातील ठिकाणाची जमीन समांतर पातळीवर असून पाण्याची निकासी होणार नाही. तसेच लगतच १५ मीटर अंतरावर खोडशिवनी, सौंदड व सिंदीपार-बिर्री गावाकडे जाणारा चौरस्ता आहे. त्यामुळे जड वाहनांचे आवागमन होणार नाही. त्यामुळे वाहतुकीची कायम डोकेदुखी होईल. या मार्गावरून सिंदीपार, बौध्दनगर, खैरी, मुंडीपार, घाटबोरी (फो.), घाटबोरी (तेली), फुलेनगर, परसोडी, बिर्री, माहुली, बोपाबोडी, विर्सी, किन्ही,चारगाव, खोडशिवनी, मोखे, सातलवाडा इत्यादी गावातील जड वाहने वाहतुक करीत असतात. त्यामुळे सदर ठिकाणी मानवजागृत गेट तयार करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.(शहर प्रतिनिधी)