डेंग्यू ताप टाळण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:27 AM2021-05-16T04:27:59+5:302021-05-16T04:27:59+5:30
गोंदिया : कोविड-१९ या जीवघेण्या आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता डेंग्यू या कीटकजन्य आजाराकडे दुर्लक्ष ...
गोंदिया : कोविड-१९ या जीवघेण्या आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता डेंग्यू या कीटकजन्य आजाराकडे दुर्लक्ष न करता दक्षता घेण्याचे आवाहन १६ मे या राष्ट्रीय डेंग्यू दिवसाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी केले आहे.
डेंग्यू तापाचा प्रभाव कमी करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. डेंग्यू जोखीमग्रस्त गावाची विविध पद्धतींनी तपासणी करून त्या गावात कीटकशास्त्रीय सर्वेक्षणाअंतर्गत ताप सर्व्हेक्षण, कंटेनर सर्व्हेक्षणात अळीनाशकाचा उपयोग करून डासांची घनता कमी करणे, कोरडा दिवस पाळणे व धूरफवारणी करणे, इत्यादी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जातात. या वर्षी डेंग्यू तापाचा प्रसार कायमचा बंद करण्यासाठी राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त ‘डेंग्यू प्रतिबंधाकरिता आपल्या घरापासून सुरुवात करा’ हे ब्रीदवाक्य घेऊन या वर्षाची राष्ट्रीय डेंग्यू दिनाची संकल्पना राबविण्यात येत आहे. डेंग्यू तापात एकाकी ताप येणे, तीव्र डोकेदुखी, स्नायुदुखी, सांधेदुखी, उलट्या होणे, अशक्तपणा, भूक मंदावणे, जास्त तहान लागणे, तोंडाला कोरड पडणे, तापामध्ये चढउतार, अंगावर पुरळ येणे, त्वचेखाली रक्तस्राव होणे, रक्तमिश्रित किंवा काळसर शौच होणे व पोट दुखणे ही लक्षणे आहेत. ताप कमी करण्यासाठी पॅरॉसिटॅमॉल घेता येईल. स्वत: ॲस्परीन व ब्रुफेनचा वापर करू नये व डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डेंग्यूच्या प्रत्येक रुग्णास प्लेटलेटची गरज नसते. उपाशीपोटी औषधोपचार घेऊ नयेत. मांत्रिक व भोंदू वैद्यांचा सल्ला टाळावा. जिल्ह्यात डेंग्यू तापाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता नागरिकांनी दक्षता घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनेस सहकार्य करावे असे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप डांगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरीश मोहबे, डॉ. प्रशांत तुरकर, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. नितीन कापसे, डॉ. संजयकुमार पांचाळ, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे व निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी कळविले आहे.
----------------
डेंग्यू ताप टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी
डेंग्यूचा प्रसार करणारे डास साचलेल्या, स्वच्छ पाण्यात वाढतात; यासाठी घराच्या अवतीभोवती पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. यामध्ये कुलर, पाण्याची टाकी, पक्ष्यांचे पिण्याचे भांडे, फ्रिजचा ट्रे, फुलदाणी, नारळाच्या करवंट्य, तुटलेले भांडे व टायर्स, इत्यादी. पाण्याची टाकी झाकून ठेवावी, कुलर रिकामे करून कोरडे करावे, डेंग्यूचा डास दिवसा चावणारा असल्यामुळे संपूर्ण अंग झाकेल असेच कपडे वापरावेत. डेंग्यूच्या उपचारांवर विशेष औषध किंवा लस उपलब्ध नाही.
.....
यामध्ये होते डासांची निर्मिती
डेंग्यू ताप हा विशिष्ट विषाणूमुळे होत असून डेंग्यूचा प्रसार हा ‘एडीस इजिप्टॉय’ नावाच्या डासाच्य मादीमार्फत होतो. या डासाची उत्पत्ती साठविलेल्या स्वच्छ पाण्यात होते. जसे रांजण, माठ, ड्रम, सिमेंटचे टाके, इमारतीवरील सिंटेक्स टाकी, घराभोवतालच्या टाकाऊ वस्तू , प्लास्टिकच्या बकेट, रिकाम्या बादल्या, नारळाच्या करवंट्या, निरुपयोगी टायर, इलेक्ट्राॅनिक्स कचरा, शोभेच्या कुंड्या, कुलर्स, इत्यादींमध्ये साठविलेल्या पाण्यात होत असते. याकरिता पाणी आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस साठवून राहणार नाही, याची खबरदारी घ्यावी.