डेल्टा प्लस विषाणूच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सावधानता बाळगावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:19 AM2021-06-30T04:19:09+5:302021-06-30T04:19:09+5:30
गोंदिया : कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. आता डेल्टा व डेल्टा प्लस कोविड विषाणूच्या नव्या प्रकारामुळे प्रादुर्भावाचे संकेत दर्शविण्यात ...
गोंदिया : कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. आता डेल्टा व डेल्टा प्लस कोविड विषाणूच्या नव्या प्रकारामुळे प्रादुर्भावाचे संकेत दर्शविण्यात येत असल्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी अधिक सावधानता बाळगून मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे व हात वारंवार स्वच्छ करणे या त्रिसूत्री कार्यक्रमामुळे तसेच शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या कोविड-१९ च्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करून कोरोनावर मात करणे शक्य आहे, असे जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी कळविले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात डेल्टा व डेल्टा प्लस या नवीन विषाणूच्या संभाव्य धोका असलेल्या पूर्वतयारीनिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नरेश तिरपुडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरीश मोहबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे उपस्थित होते. महाराष्ट्रात कोविड-१९ चा नवीन प्रकार डेल्टा व डेल्टा प्लसचे बाधित रुग्ण रत्नागिरी, जळगाव, ठाणे, पालघर, मुंबई व सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळलेले आहे. या नवीन विषाणूमध्ये संसर्गाची वाढीव क्षमता आहे. डेल्टा व डेल्टा प्लस हा नवीन विषाणू फुप्फुसाच्या अवयवास जास्त आकर्षित करतो. विषाणूचा औषधोपचाराला कमी प्रतिसाद आहे. डेल्टा व डेल्टा प्लस हा नवीन कोविड विषाणू प्रथम मार्च २०२१ मध्ये युरोप देशाच्या तिसऱ्या लाटेत आढळला. सध्या भारताव्यतिरिक्त अमेरिका, लंडन, पोर्तुगाल, स्वित्झर्लंड, जपान, पोलंड, नेपाळ, चीन व रशिया या देशांत डेल्टा व डेल्टा प्लस हा नवीन कोविड विषाणू आढळला आहे. या कोविड विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आयसीएमआर व इतर राष्ट्रीय पातळीच्या आरोग्य संस्थांनी तिसऱ्या लाटेच्या स्वरूपात वर्तविली आहे. सध्या गोंदिया जिल्ह्याचा समावेश लेव्हल १ मध्ये असल्याने वेळेत बदल करून काही निर्बंध लावण्यात आलेले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व प्रकारची आस्थापने, दुकाने व व्यवसाय यांना सोमवार ते शुक्रवार सायंकाळी ४ वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली आहे. जिल्ह्यात येणाऱ्या-जाणाऱ्यांची संख्या लक्षात घेता डेल्टा व डेल्टा प्लस हा नवीन कोविड विषाणू गोंदिया जिल्ह्यात दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या बाजारपेठांना वेळेचे बंधन घालण्यात आले आहे. सर्व सामाजिक व राजकीय समारंभांस व लोकांच्या जमावास मर्यादेचे निर्बंध लावण्यात आले आहेत.
.......
पुरेसा औषधसाठा ठेवा
जिल्ह्यातील सर्व नागरिकांचे लवकरात लवकर लसीकरण करावे, अँटिजन व आरटी-पीसीआर चाचण्यांची संख्या वाढवावी, नागरिकांमध्ये कोरोनाबाबत जनजागृती करावी, आरोग्य यंत्रणा व आवश्यक साहित्यांची पुरेशी व्यवस्था ठेवावी. उपचाराकरिता लागणाऱ्या आवश्यक औषधांचा मुबलक साठा ठेवावा, असे निर्देश जिल्हाधिकारी खवले यांनी आरोग्य विभागाला दिले.
...................