नागरिकांनी हत्तीरोगाच्या समूळ उच्चाटनाचा संकल्प घ्यावा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:20 AM2021-07-02T04:20:24+5:302021-07-02T04:20:24+5:30
गोंदिया : हत्तीरोग निर्मूलन मोहीम १ जुलैपासून जिल्ह्यात सुरू होत असून, आरोग्य विभागामार्फत कोरोना प्रतिबंधात्मक मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन ...
गोंदिया : हत्तीरोग निर्मूलन मोहीम १ जुलैपासून जिल्ह्यात सुरू होत असून, आरोग्य विभागामार्फत कोरोना प्रतिबंधात्मक मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे. हत्तीरोगाचा समूळ उच्चाटन करण्याकरिता हत्तीरोग निर्मूलन मोहिमेला जिल्ह्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन हत्तीरोगावर आळा घालण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी कळविले आहे.
१ ते १५ जुलै या कालावधीत जिल्ह्यात सामुदायिक औषधोपचार मोहीम राबविण्यात येणार आहे. या कालावधीत आरोग्य विभागाचे कर्मचारी आपल्या घरापर्यंत येणार असून, हत्तीरोग निर्मूलनाच्या दृष्टीने गरोदर माता, अति गंभीर आजारी रुग्ण व २ वर्षांखालील बालके वगळता पात्र नागरिकांना वयोगटानुसार डीईसी व अलबेंडाझोलच्या गोळ्या देऊन त्यांचे सेवन करावयाचे आहे. सामुदायिक हत्तीरोग औषधोपचार मोहिमेंतर्गत वितरित करण्यात येणाऱ्या डीईसी गोळ्यांचे काहीही दुष्परिणाम होत नाहीत. त्यामुळे नागरिकांनी मनात कोणतीही शंका न बाळगता डीईसी गोळ्यांचे सेवन करावे, असेही जिल्हाधिकारी खवले यांनी सांगितले.