भर पावसाळ्यातही नागरिकांची पाण्यासाठी भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 12:43 AM2017-08-02T00:43:26+5:302017-08-02T00:43:48+5:30
येथील सहकार नगर व शहराच्या इतर काही भागातील नळांना पाणी येत नसल्याने भर पावसाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
डी.आर.गिेºहेपुंजे।
लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा : येथील सहकार नगर व शहराच्या इतर काही भागातील नळांना पाणी येत नसल्याने भर पावसाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
गेल्या एप्रिल, मे, जून व जुलै या चार महिन्यांपासून नळाला पाणी येत नाही. मात्र ग्राहकांना देयक नियमित पाठविले जाते. ग्राहकांनी याची तक्रार जीवन प्राधिकरण कार्यालयाकडे केली. मात्र त्याचा कसलाही उपयोग झाला नाही. ही नळयोजना ३५ वर्षे जुनी असून नवीन नळयोजना मंजुर झाली आहे. लवकरच तुम्हाला पाणी मिळेल. असे आश्वासन लोकप्रतिनिधी गेल्या तीन-चार वर्षांपासून देत आहेत.
जुन्या नळ योजनेचे पाईप सिंमेटचे आहेत. प्रेशर वाढविल्यास ते फुटतात. त्यामुळे ती दुरुस्ती आपल्यालाच करावी लागणार या भितीने जीवन प्राधिकरणचे अधिकारी व कर्मचारी प्रेशर वाढवित नसल्याची माहिती आहे. जास्त वेळ पंम्पीग केल्यास नळाला पाणी येऊ शकते. पण वरिष्ठ अधिकारी, विभागीय अधिकारी, विद्युत देयक जास्त येते, पाण्याच्या पाणीपट्टीतून तेवढा पैसा जमा होत नाही. असे कारण पुढे करुन याकडे दुर्लक्ष करतात.
शहरात कुठेही सार्वजनिक नळ नाहीत. प्रत्येकाकडे मिटर लागलेले आहेत. तरीही पाण्याची चोरी होते. तर दुसरीकडे नागरिक, महिला पाण्यासाठी भटकतात.
सहकार नगरात पाणीच येत नसल्याने येथील अबालवृद्ध महिला तिरोडा गोंदिया- महामार्ग ओलांडून शहिद मिश्रा वॉर्डात पाण्यासाठी सकाळ-संध्याकाळ जाताना दिसतात. अशात कधी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
लिकेज, टुल्लू पंपमुळे अडचण
शहराच्या इतरही काही भागात नळाच्या पाण्याची स्थिती फारच वाईट आहे. पिण्याचे पाणी आवश्यक असल्याने दूरपर्यंत पाण्यासाठी भटकंती करावी लागते. सहकार नगरात पाणी येत नाही. याबाबत जीवन प्राधिकरणचे वरिष्ठ अधिकारी मडके यांच्याशी संपर्क साधून समस्या सांगितली असता लिकेज आणि टुल्लू पंपमुळे पाणी पोहचत नसल्याचे त्यांनी सांगितले.
दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
शहरात सलग नाल्याची व्यवस्था नसल्याने शहरातील सांडपाणी शहरातच मुरते. त्यामुळे विहिरीचे पाणी दूषित होण्याची शक्यता आहे. शहरातील विहिरींच्या बाजुनेच सांडपाणी मुरते. त्यामुळे ते पाणी पिण्यास अयोग्य असल्याची ओरड नागरिकांमध्ये आहे. नगर परिषदेतर्फे ब्लिचिंग पावडरचा वापर देखील केला जात नाही. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.