बदलत्या वातावरणामुळे नागरिक धास्तावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:22 AM2021-06-01T04:22:19+5:302021-06-01T04:22:19+5:30
महावितरणने विविध आकार व कर कमी करावे नवेगावबांध : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडच्या वतीने विविध कर ...
महावितरणने विविध आकार व कर कमी करावे
नवेगावबांध : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडच्या वतीने विविध कर आकारणी लावून सीएल मीटरधारक ग्राहकांचे आर्थिक शोषण करीत असल्याचा आरोप स्थानिक वीजग्राहकांनी केला आहे. अव्वाच्या सवा कर आकारणी करून महावितरण कंपनी आर्थिक शोषण करीत आहे. स्थिर व इतर आकार कमी करून वीजग्राहकांची आर्थिक लूट महावितरणने थांबवावी, अशी मागणी स्थानिक सीएल मीटरधारक वीजग्राहकांनी केली आहे.
रेती साठ्याकडे कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष
परसवाडा : तिरोडा तालुक्यातील वैनगंगा नदीकाठावरील रेती घाट परिसरात व शहरातील चंद्रभागा नाका, चुरडी, शाल्व्हीन बारमागे तसेच, अन्य ठिकाणी शहरात रेतीचा मोठा साठा पडलेला असतो. रेतीमाफिया घाटांतून आणलेली रेती शहरातील वेगवेगळ्या भागात टाकून देत आहेत.
रासायनिक भाज्यांमुळे आजारांत वाढ
सालेकसा : शेतकरी रासायनिक खतांचा वापर करीत असल्यामुळे सुपीक शेतीवर परिणाम होऊ लागला आहे. शेतीत अधिक उत्पन्न घेण्याकरिता रासायनिक खतांसोबत दिवसेंदिवस महागड्या कीटकनाशकांचा वापर होऊ लागला आहे. यामुळे रासायनिक भाज्यांमुळे आजाराच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.
प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर वाढला
गोरेगाव : शहरासह जिल्ह्यात प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून, सगळीकडे प्लॅस्टिकचा कचरा दिसत आहे. शासनाच्या आदेशाला तिलांजली मिळत आहे.
रेल्वे चौकीला उड्डाणपुलाची प्रतीक्षा
आमगाव : किडंगीपार येथील मुंबई-हावडा मार्गावर असलेली रेल्वे चौकी मालवाहतूक व प्रवासी वाहनांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. या मार्गावरील रेल्वे चौकी भागात उड्डाणपुलाची मागणी प्रलंबित आहे.
सडक योजनेच्या रस्त्यांची दुरवस्था
तिरोडा : तालुक्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत रस्त्यांची निर्मिती व डांबरीकरणाचे काम करण्यात आले. यापैकी अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली असून, लोकांना त्रास सहन करावा लागत आहे.
तंटामुक्त समितीचे तंट्यांकडे झाले दुर्लक्ष
बोंडगावदेवी : शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली आहे. तंटामुक्त घोषित झालेल्या गावांना शासनाने बक्षीस रूपात रक्कम दिली. मात्र रक्कम मिळाल्यानंतर या समित्यांचे तंट्यांकडे दुर्लक्ष झाले आहे.
नाल्यांवरचे अतिक्रमण काढा
गोंदिया : शहरात मोठ्या प्रमाणात नाल्यांवर अतिक्रमण करण्यात आले आहे. यामुळे सफाई कामगारांना नाल्यांची सफाई करणे कठीण होत आहे. परिणामी कचरा साचून नाल्या बंद झाल्या आहेत.
दिव्यांग, निराधारांवर उपासमारीची वेळ
परसवाडा : तिरोडा तालुक्यातील संजय गांधी, श्रावणबाळ, विधवांना, तसेच आर्थिक कुटुंब साहाय्यांना चार-पाच महिन्यांपासून अनुदान न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
घटत्या जनावर संख्येने दुग्ध व्यवसाय डबघाईस
अर्जुनी-मोरगाव : देशाची अर्थव्यवस्था कृषीवर आधारित असल्याने शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व दुग्धव्यवसाय केला जातो. परंतु, आधुनिकीकरण आणि यांत्रिकीकरणामुळे मोठ्या प्रमाणात पशुधन घटत आहे. परिणामी, ग्रामीण भागातील दुग्ध व्यवसाय डबघाईस आला आहे. १०-१५ वर्षांपूर्वी ग्रामीण भागात प्रत्येक शेतकऱ्याकडे गायी-म्हशी असायच्या. पशुपालन आणि दुग्ध व्यवसायातून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक हातभार लागायचा. शेतकऱ्यांची स्वतःची गरज भागूनसुद्धा दूध, दही, ताक व लोणी भरपूर प्रमाणात मिळत होते. परंतु, मागील काही वर्षांत पशुधनात प्रचंड घट झाली आहे. त्यामुळे आता गावखेड्यांतही दुधाच्या पिशव्या मिळू लागल्या आहेत. ग्रामीण भागात जनावरे चराईसाठी जागा राखीव असायची व गुराखीसुद्धा असायचे. परंतु, आता जनावरे चारण्यासाठी गुराखी मिळत नाही.