नगर परिषद तयार करीत आहे ई-लिलाव पोर्टल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:24 AM2021-01-09T04:24:11+5:302021-01-09T04:24:11+5:30

कपिल केकत (लोकमत विशेष) गोंदिया : नगर परिषदेने मालमत्ता कर वसुलीसाठी कंबर कसली असून थकबाकीदारांवर कारवाईचे सत्रच सुरू केले ...

The city council is creating an e-auction portal | नगर परिषद तयार करीत आहे ई-लिलाव पोर्टल

नगर परिषद तयार करीत आहे ई-लिलाव पोर्टल

Next

कपिल केकत (लोकमत विशेष)

गोंदिया : नगर परिषदेने मालमत्ता कर वसुलीसाठी कंबर कसली असून थकबाकीदारांवर कारवाईचे सत्रच सुरू केले आहे. अशात आता मोठ्या थकबाकीदारांसाठी आणखीच धोका वाढल्याचे दिसत आहे. नगर परिषद ई-लिलाव पोर्टल तयार करीत असून मालमत्ता कर न भरणाऱ्यांच्या मालमत्तांचा यातून लिलाव करणार आहे. यासाठी तयारी सुरू झाली असून नगर परिषदेच्या कर विभागाकडून थकबाकीदारांना नोटीस बजावण्याचे काम सुरू झाले आहे.

शहरातील मोठ्या थकबाकीदारांमुळे नगर परिषदेचे टेन्शन चांगलेच वाढले आहे. यंदा नगर परिषदेला ११ कोटींच्या घरात मागील थकबाकी व चालू मागणी वसुलीचे टार्गेट आहे. आतापर्यंत भांडण-तंटे किंवा राजकारणाचा वापर करून पैसेवाल्यांनी मालमत्ता कर भरला नाही. परिणामी थकबाकीचा आकडा वाढत चालला आहे. मात्र आता अशांची गय न करता त्यांच्यावर थेट कारवाई करण्याचा पवित्राच हाती घेण्यात आल्याचे दिसत आहे. यातूनच आता कर वसुली पथकाने मालमत्तांना सील करण्यास सुरूवात केली आहे. यातून नगर परिषद पथकाने डिसेंबर महिन्यात सुमारे १.२८ कोटींची मालमत्ता कर वसुली केली आहे.

मात्र एवढ्यावरच नगर परिषद शांत बसणार नसून मोठ्या थकबाकीदारांकडे अडलेली रक्कम काढण्यासाठी नगर परिषद आता ई-लिलाव पोर्टल तयार करीत आहे. यामुळे मोठ्या थकबाकीदारांना आता आणखीच धोका वाढला आहे. या थकबाकीदारांकडील रक्कम काढण्यासाठी नगर परिषद कर विभागाकडून नोटीस बजावले जात असून त्यांना मुदत दिली जात आहे. ही सर्व तयारी नगर परिषदेने सुरू केली असून लवकरच अशा मोठ्या थकबाकीदारांना लिलावाची नोटीस बजावले जाणार आहे. त्यानंतरही थकबाकी न भरणाऱ्यांच्या मालमत्तांचा या पोर्टलद्वारे लिलाव केला जाणार असल्याचे उपमुख्याधिकारी विशाल बनकर यांनी सांगितले.

------------------------------------------

मोहरील काढत आहेत मालमत्तांचे छायाचित्र

शहरातील मोठ्या थकबाकीदारांची माहिती वॉर्डनुसार मोहरील यांच्याकडे असते. अशात आता मोठ्या थकबारीदारांची माहिती मोहरीलकडून गोळा केली जात आहे. तसेच मोहरील अशा थकबाकीदारांच्या मालमत्तांचे छायाचित्र काढत आहेत. ही सर्व माहिती व छायाचित्र ई-लिलाव पोर्टलवर अपलोड केली जाणार आहे. त्यानंतर थकबाकीदारांना लिलावाचे नोटीस बजावले जाणार असून त्यानंतरही त्यांनी कर न भरल्यास मालमत्तांचा लिलाव केला जाणार आहे. यामुळे आता मोठ्या थकबाकीदारांना घेऊन नगर परिषदेने अतिशय गंभीर निर्णय घेतल्याचे दिसत आहे.

------------------------------------

चौकांत होर्डिंग लावणार

कर विभागाकडून वॉर्डनिहाय थकबाकीदारांना नोटीस बजावली जाणार आहे. शिवाय कर वसुलीसाठी जाहीर दवंडी केली जाणार आहे. याशिवाय थकबाकीदारांच्या नावांची यादी होर्डिंगच्या माध्यमातून शहरातील मुख्य चौकांमध्ये लावली जाणार आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत थकबाकीदार नेते मंडळींना मधात पाडून मालमत्ता कर भरत सुटून जात होते. मात्र हाच प्रकार नगर परिषदेच्या अंगलट येत असल्याने यंदा मात्र कुणाचीही गय न करता फक्त कर वसुली हेच टार्गेट पथकाने ठरवून घेतले आहे.

Web Title: The city council is creating an e-auction portal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.