प्लास्टिकमुक्त शहरसाठी नगर परिषदेची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 06:00 AM2020-02-29T06:00:00+5:302020-02-29T06:00:16+5:30
प्लास्टिकचा वापर पर्यावरणासह मानव पशुंसाठीही धोक्याचा ठरत आहे.पर्यावरणाचा ऱ्हास होत असतानाच प्लास्टिकमुळे पशुंचा जीव जात आहे.शिवाय मानवी आरोग्याच्या दृष्टीने प्लास्टिकचा वापर धोकादायक असल्याचे सिद्ध झाले आहे.प्लास्टिक वापराचे हे दुष्परिणाम बघता राज्यात प्लास्टिक बंदी करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : १ मे पासून शहर सिंगल यूज प्लास्टिकमुक्त शहर झाले पाहिजे असे निर्देश पर्यावरण विभागाने दिले आहेत. त्यानुसार नगर परिषद कामाला लागली असून स्वच्छता विभागाकडून जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. यासाठी आराखडा पाठविण्यात आला असून त्यानुसार नगर परिषदेला कारवाई करावी लागणार आहे.
प्लास्टिकचा वापर पर्यावरणासह मानव पशुंसाठीही धोक्याचा ठरत आहे.पर्यावरणाचा ऱ्हास होत असतानाच प्लास्टिकमुळे पशुंचा जीव जात आहे.शिवाय मानवी आरोग्याच्या दृष्टीने प्लास्टिकचा वापर धोकादायक असल्याचे सिद्ध झाले आहे.प्लास्टिक वापराचे हे दुष्परिणाम बघता राज्यात प्लास्टिक बंदी करण्यात आली आहे. असे असताना आजही मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा वापर सुरूच असून नागरिकही सर्रास प्लास्टिक पिशव्यांचा वापर करताना दिसत आहे.
सिंगल युज प्लास्टिकचा हा अतिरेकी वापर थांबावा या दृष्टीने आता पर्यावरण विभागाने कठोर पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. या दृष्टीने विभागाने सर्व महानगर पालिका, नगर पालिका, नगर पंचायतींना १ मे पर्यंत आपापले शहर सिंगल युज प्लास्टिकमुक्त करण्याचे निर्देश दिले. यासाठी करावयाचा आराखडाही पाठविला आहे.
या आराखड्यात संबंधितांना काय-काय करावयाचे आहे याबाबत कळविण्यात आले आहे. त्यातील पहिला म्हणून नगर परिषद स्वच्छता विभागाने शहरातील व्यावसायिकांशी संपर्क साधून सिंगल युज प्लास्टिक वापरू नये याबाबत सांगितले जात आहे. त्यांच्याकडून प्लास्टिक वापरणार नाही असे स्वयंघोषणापत्र भरुन घेतले जात आहे.
सुमारे १०० व्यावसायिकांचे भरले घोषणापत्र
नगर परिषद स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांनी सिंगल युज प्लास्टिक वापरावर निर्बंध बसावा. प्लास्टिक वापराचे दुष्परिणाम त्यांना कळावे या दृष्टीने शहरातील व्यावसायिकांची भेट घेऊन जनजागृती करण्यास सुरूवात केली आहे. यांतर्गत व्यावसायिकांना बंदी असलेले व बंदी नसलेल्या प्लास्टीक साहित्यांची माहिती असलेले पत्रक दिले जात आहे. या व्यावसायिकांकडून प्लास्टिक वापरणार नाही, असे स्वयंघोषणा पत्र भरुन घेतले जात आहे. अशाप्रकारे सुमारे १०० हून अधिक व्यवसायीकांचे घोषणापत्र भरुन घेण्यात आले आहेत