शहरवासीयांनो वेळीच व्हा सावध! संसर्गात होतेय वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:57 AM2021-02-28T04:57:12+5:302021-02-28T04:57:12+5:30
गोंदिया : गोंदिया शहर आणि तालुक्यात सातत्याने कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. शनिवारी (दि.२७) आणखी गोंदिया तालुक्यात १९ ...
गोंदिया : गोंदिया शहर आणि तालुक्यात सातत्याने कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. शनिवारी (दि.२७) आणखी गोंदिया तालुक्यात १९ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे या तालुक्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ९६ वर पोहोचली असून हा तालुका कोरोनाचे हॉटस्पाॅट होत चालला आहे. त्यामुळे गोंदिया शहर आणि तालुकावासीयांना वेळीच सावध होण्याची गरज आहे. अन्यथा ही बाब शहरवासीयांनाच महाग पडू शकते.
जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असला तरी गोंदिया तालुक्यात सातत्याने कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने आरोग्य प्रशासनासह शहर आणि तालुकावासीयांची चिंता वाढली आहे. शनिवारी जिल्ह्यात २२ बाधितांची नोंद झाली, तर ७ बाधितांनी कोरोनावर मात केली. शनिवारी आढळलेल्या २२ रुग्णांमध्ये सर्वाधिक १९ रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहेत. सडक अर्जुनी १, अर्जुनी मोरगाव १, बाहेरील १ रुग्णाचा समावेश आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत ७०१९३ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ५८४०२ नमुने निगेटिव्ह आले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. या अंतर्गत ६८५३९ स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ६२३३८ नमुने निगेटिव्ह आले. जिल्ह्यात आतापर्यंत १४४२२ कोरोनाबाधित आढळले असून त्यापैकी १४११६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत १२१ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून ४० स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया प्रयोग शाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
........
कोरोनाचा रिकव्हरी दर ९७.९७
मागील पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे कोरोना रिकव्हरी दरसुद्धा कमी झाला आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्याचा कोरोना रिकव्हरी ९७.९७ टक्के आहे. गोंदिया तालुक्यात सातत्याने रुग्णसंख्या वाढत असल्याने थोडी चिंता वाढली आहे.
......
जिल्ह्यात ५३७ फ्रंट लाइन योद्ध्यांना दुसरा डोस
कोरोना लसीकरणांतर्गत जिल्ह्यातील फ्रंट लाइन योद्ध्यांना लसीकरण करण्यात आले होते. यानंतर आता त्यांना दुसरा डोस दिला जात आहे. यांतर्गत ५३७ जणांना आतापर्यंत दुसरा डोस देण्यात आला आहे. दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेंतर्गत ४३१ जणांना लसीकरण करण्यात आले आहे.
........
६० वर्षांवरील नागरिकांना करावी लागणार नोंदणी
केंद्र सरकारने २ मार्चपासून ६० वर्षांवरील नागरिकांना कोरोना लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कोविन २ ॲप तयार करण्यात आले आहे. या ॲपवर लसीकरण करणाऱ्यांची यादी उपलब्ध करून दिली जाणार आहे. मात्र, यासाठी ६० वर्षांवरील नागरिकांना ऑनलाइन नोंदणी करावी लागणार असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.