सोडले रेल्वेसाठी अन् मिळाले शहराला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 10:23 PM2019-05-31T22:23:21+5:302019-05-31T22:23:45+5:30
येथील रेल्वे स्थानक आणि रेल्वे कर्मचारी वसाहतीमध्ये पाणी टंचाई निर्माण झाल्याने बिरसोला येथील वाघ नदीच्या पात्रात पुजारीटोला जलाशयाचे पाणी सोडण्यात आले. यामुळे या दोन्ही ठिकाणी पाणी टंचाईवर मात करणे शक्य झाले. मात्र बाघ नदीत सोडलेले पाणी पाणी पुढे वैनगंगा नदीपात्रातून डांर्गोलीपर्यंत वाहून गेल्याने पाणी पुरवठा योजनेच्या विहिरींची पातळी वाढली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येथील रेल्वे स्थानक आणि रेल्वे कर्मचारी वसाहतीमध्ये पाणी टंचाई निर्माण झाल्याने बिरसोला येथील वाघ नदीच्या पात्रात पुजारीटोला जलाशयाचे पाणी सोडण्यात आले. यामुळे या दोन्ही ठिकाणी पाणी टंचाईवर मात करणे शक्य झाले. मात्र बाघ नदीत सोडलेले पाणी पाणी पुढे वैनगंगा नदीपात्रातून डांर्गोलीपर्यंत वाहून गेल्याने पाणी पुरवठा योजनेच्या विहिरींची पातळी वाढली. त्यामुळे शहरातील पाणी टंचाईवर मात करण्यास मदत झाली. एकंदरीत सोडले रेल्वेसाठी आणि मिळाले शहराला असे चित्र निर्माण झाले.
येथील रेल्वे स्थानकाला बिरसोला जवळील बाघ नदीतून पाणी पुरवठा होतो. तर शहराला बिरसोला पासून सुमारे २० किमी. अंतरावरील डांर्गोली येथून पाणी पुरवठा होतो. बिरसोला येथे बाघ व वैनगंगा नदीचे संगम असून पुढे बाघ नदी वैनगंगाच्या नावाने ओळखली जाते. रखरखत्या उन्हामुळे सध्या बाघ नदी आटली आहे. यामुळे रेल्वे स्थानकाला पाणी पुरवठा करणे अडचणीचे ठरत आहे. अशात पुजारीटोला प्रकल्पातून बिरसोलासाठी पाणी सोडण्यात आले आहे. कालव्याच्या माध्यमातून पाणी बिरसोला येथे पोहचते. हेच पाणी पुढे डांर्गोलीपर्यंत जात असल्याची माहिती आहे. डांर्गोली जवळील वैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडले असून येथूनच १७ किमी अंतरावरील गोंदिया शहराला पिण्याचा पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र वैनगंगा नदीचे पात्र यंदा मार्च महिन्यातच कोरडे पडले.त्यामुळे शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली होती. यावर मात करण्यासाठी महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागाने सिंचन विभागाच्या मदतीने शहरापासून ८० कि.मी.अंतरावर असलेल्या पुजारीटोला धरणाचे पाणी आणून पाणी टंचाईवर मात केली. पुजारीटोला प्रकल्पातून आतापर्यंत दोन वेळा डांर्गोली येथील वैनगंगा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात आले. त्यानंतर आता पुन्हा १ जून रोजी सकाळी ८ वाजता तिसऱ्यांदा पाणी सोडले जाणार होते. मात्र डांर्गोलीजवळ वैनगंगा नदीत पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने आता तिसऱ्यांदा पाणी सोडण्याचे थांबविण्यात आले आहे.
गुरूवारी (दि.३०) डांर्गोली जवळील वैनगंगा नदीतील विहिरीत १०० सेमी पाणी उरले होते. मात्र शुक्रवारी (दि.३१) सकाळी पाण्याची पातळी पाहली असता १३२ सेमी पाणी त्यात होते. एका दिवसात ३२ सेमी पाणी वाढल्याने हे पाणी बिरसोला येथून आल्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यातच आता आणखी पातळी वाढण्याचा अंदाज आहे.
१ जूनपासून पुजारीटोला प्रकल्पातून पाणी सोडण्याबाबत पाटबंधारे विभागाचे उपअभियंता बिसेन यांना सांगीतले होते. मात्र आता पाच-सहा दिवस पुरेल ऐवढा पाणीसाठा असल्याने पुजारीटोलाचे पाणी सोडू नये असे सिंचन विभागाला कळविले आहे.
-राजेंद्र मडके,
उप विभागीय अभियंता, मजिप्रा, गोंदिया