शहर तणावपूर्ण शांततेत

By admin | Published: June 17, 2015 01:38 AM2015-06-17T01:38:16+5:302015-06-17T01:38:16+5:30

नगर परिषद कर्मचारी संघटनेचे नेते छेदीलाल इमलाह यांची हत्या झाल्याने शहराचे वातावरण तापलेले होते. त्यात

The city tensioned peacefully | शहर तणावपूर्ण शांततेत

शहर तणावपूर्ण शांततेत

Next

चौकाचौकांत पोलिसांचा बंदोबस्त नगरसेवक लोकेश यादवला अटक तीन दिवसांनंतर बाजारपेठ उघडली
गोंदिया : नगर परिषद कर्मचारी संघटनेचे नेते छेदीलाल इमलाह यांची हत्या झाल्याने शहराचे वातावरण तापलेले होते. त्यात सोमवारी (दि.१५) सायंकाळी माजी उपाध्यक्ष वनगरसेवक लोकेश (कल्लू) यादव याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे तापलेल्या वातावरणात अधिकची भर पडली आहे. असे असतानाही मंगळवारी (दि.१६) शहरातील बाजारपेठ उघडल्याचे दिसले. मात्र चौकाचौकांत पोलिसांचा चोख बंदोबस्त दिसून आला असून शहर तणावपूर्ण शांततेत होते.
शनिवारी (दि.१३) सायंकाळी छेदीलाल इमलाह यांची हत्या झाल्यानंतर शहरात एकच खळबळ माजली होती. याचे पडसाद रविवारीही (दि.१४) दिसून आले. शहरातील बाजारपेठ शंभर टक्के बंद दिसून आली. शहरात काही अनुचित प्रकार घडू नये या दृष्टीने शहरातील चौकाचौकांत पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. हे सर्व सुरू असतानाच सोमवारी (दि.१५) सायंकाळी पोलिसांनी नगरसेवक लोकेश यादव याला अटक केली आहे.
यादव याला ताब्यात घेतल्यावर समर्थकांत रोष दिसून आला व यादव चौक परिसरात त्यांनी गर्दी केली होती. तर यादव याच्या अटकेनंतर काही अनुचित प्रकार घडतील या भीतीने व्यापाऱ्यांनी लगेच आपापली दुकाने बंद केली होती.
शिवाय शहरात पुन्हा वातावरण तापणार असल्याची चिन्हे दिसून येत होती. मात्र काही अनुचित प्रकार घडले नाही. त्यामुळेच मंगळवारी (दि.१६) बाजारपेठ उघडण्यात आली होती. मागील तीन दिवस शुकशुकाट असलेल्या बाजारपेठेत मंगळवारी चहलपहल दिसून आली. मात्र कधी काय घडणार याबाबत सांगता येत नसल्याने शहर तणावपूर्ण शांततेत होते. (शहर प्रतिनिधी)

यादवला २७ पर्यंत पोलीस कोठडी
४सोमवारी (दि.१५) पोलिसांनी नगरसेवक व माजी उपाध्यक्ष लोकेश यादव याला त्याच्या घरातून सायंकाळी अटक केली. छेदीलाल इमलाह यांच्या खून प्रकरणात भादंवि कलम ३०२ अंतर्गत त्याला अटक करण्यात आल्याचे कळले. न्यायालयात सादर केल्यावर त्याला येत्या २७ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच त्याचा भाऊ नगरसेवक पंकज यादव हा फरार असल्याचेही कळले. यादव याला अटक करण्यात आल्याने यादव चौक परिसरासह शहरातच तणाव आहे. त्याला अटक करण्यासाठी पोलीस गेले असता यादव समर्थकांनी गर्दी केली होती.

पोलीस बंदोबस्त
४शहरात काही अनुचित प्रकार घडू नये या दृष्टीने शहरातील चौकाचौकांत पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. येथील नेहरू चौक, गोरेलाल चौक, गांधी प्रतिमा, नगर परिषद कार्यालय, चांदनी चौक यासह अन्य चौकांतही फेरफटका मारला असता पोलीस बंदोबस्त दिसला. विशेष म्हणजे शहरातील भवानी चौकात पोलिसांचे मोठे वाहनच बंदोबस्तासाठी लावण्यात आले होते. पुढे शंकर चौक ते यादव यांच्या घरापर्यंत बॅरिकेटस् लावण्यात आले होते व सी-६० चे सशस्त्र पोलीस कर्मचारी बंदोबस्तावर दिसले. यादव यांच्या हॉटेलमध्येही पोलिसांचीच गर्दी दिसली. परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सी-६० च्या सहा पार्ट्या तसेच जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांतून ५०० पोलीस कर्मचारी मागविण्यात आल्याची माहिती आहे.

Web Title: The city tensioned peacefully

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.