तिरोडावासीय डासांनी त्रस्त, नगर परिषद म्हणते सर्वच मस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:33 AM2021-08-14T04:33:49+5:302021-08-14T04:33:49+5:30
तिरोडा : शहरातील केरकचऱ्याची नियमित विल्हेवाट लावली जात नसल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला असून साथीच्या आजारांची लागण होण्याची शक्यता बळावली ...
तिरोडा : शहरातील केरकचऱ्याची नियमित विल्हेवाट लावली जात नसल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला असून साथीच्या आजारांची लागण होण्याची शक्यता बळावली आहे. पाणी पुरवठा योजनेचे पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु असल्याने काही भागातील नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याची ओरड आहे. शहरातील समस्यांनी नागरिक त्रस्त असताना नगर परिषद मात्र सर्वच आलबेल असल्याचे भासवित असल्याने शहरवासीयांमध्ये रोष व्यक्त होत आहे.
तिरोडा शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागांतर्गत पाणी पुरवठा केला जातो. सध्या पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु असून काही ठिकाणी नियमबाह्य काम केले जात आहे. तर, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन गटारलाईन टाकली जात आहे. मात्र याकडे स्थानिक नगर परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे शहरवासीयांमध्ये राेष व्यक्त होत आहे. दूषित पाणी आणि डासांच्या प्रादुर्भावामुळे डेंग्यू, मलेरिया या सारख्या आजारांचा धोका वाढण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. नगर परिषदेने याची दखल घेत शहराच्या स्वच्छतेकडे लक्ष देऊन डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्वरित डासनाशक फवारणी करावी अन्यथा या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा शहरवासीयांनी दिला आहे.