शहराची लाइफलाइन मानागड तलावात ठणठणाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:03 AM2021-09-02T05:03:14+5:302021-09-02T05:03:14+5:30
विजय मानकर सालेकसा : संपूर्ण सालेकसा शहराची ऐन गरजेच्यावेळी तहान भागविणारा व विविध उपयोगासाठी पाण्याचा पुरवठा करून देणारा मानागड ...
विजय मानकर
सालेकसा : संपूर्ण सालेकसा शहराची ऐन गरजेच्यावेळी तहान भागविणारा व विविध उपयोगासाठी पाण्याचा पुरवठा करून देणारा मानागड मध्यम प्रकल्पात अजूनपर्यंत ठणठणाट असल्यामुळे हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात सालेकसा शहराला भीषण पाणी टंचाईला द्यावे लागण्याची शक्यता आहे. जलाशय अंतर्गत ओलिताखाली येणाऱ्या शेतीला सुध्दा पाणी मिळण्याची शक्यता कमी असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
सालेकसापासून आठ कि.मी. अंतरावर असलेल्या मानागड जलाशयातून एकूण १३ कि.मी. लांबीचा मुख्य कालवा असून मधात सीतेपाला आणि हलबीटोला गावाला स्पर्श करीत पूर्वेकडून सालेकसा (आमगाव खुर्द) शहरात प्रवेश करतो. तालुका मुख्यालयातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयाच्या परिसराजवळून मुख्य कालवा वाहत असताना संपूर्ण शहराच्या अगदी मधोमध वाहत जाताना एकूण १३ कि.मी.चा प्रवास करत असतो. या मुख्य कालव्यातून एकूण २५ उपकालवे असून या उपकालव्याच्या माध्यमातूनसुद्धा शहराच्या प्रत्येक भागात विविध उपयोगी कामासाठी पाण्याची सोय उपलब्ध होत असते. पुढे शहराबाहेर परिसरातील धान पिकांना सिंचनासाठी हे सर्व कालवे जीवनदायिनी म्हणून काम करतात. मानागड जलाशयातून कालव्याद्वारे एकूण १३३५ हेक्टर शेतीला सिंचनाची सोय केली जाते. या जलाशयाची एकूण साठवण क्षमता ६.०५ दश लक्ष घनमीटर असून आता पावसाळा परतीच्या वाटेवर येत असतानासुद्धा जलाशयात आतापर्यंत १.३५ दशलक्ष घनमीटर पाणी संग्रहित झाले आहे. पाण्याचे एकूण साठवण क्षमता १९ टक्के असून त्यापैकी १७ टक्के साठा राखीव जलसाठा आहे. केवळ दोन टक्के पाणीच सोडण्यासाठी उपलब्ध आहे. १३३५ हेक्टर पैकी किमान ९०० हेक्टर क्षेत्रातील शेतीला पाणी देणे बंधनकारक असते. पुढे पाऊस असाच राहिला तर एका पाण्यासाठी संकटात सापडलेल्या पिकांना सुद्धा पुरेशा पाणी देता येणार नाही. त्यामुळे पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. शहरातून गेलेल्या कालव्यात जेव्हा पाणी वाहत असते त्यावेळी लोकांची समस्या दूर तर होतेच सोबतच शहरातील विहीर बोअरवेलचीसुद्धा पाण्याची पातळी वाढत असते. त्यामुळे पाण्याची टंचाई आपोआप कमी होण्याला मदत मिळत असते.
बॉक्स....
मुसळधार पावसाची प्रतीक्षा
पावसाचे तीन महिने सरले, तरी यंदा पाऊस सरासरी निम्म्याहून खालीच आहे. मागील तीन महिन्यात या तालुक्यात एकदाही मुसळधार पाऊस आला नाही. त्यामुळे कुठेही पाणीसाठा झालेला नाही. जेव्हा केव्हा पाऊस पडला फक्त रिपरिप किंवा सरवा स्वरूपाचा आला. यंदा एकदाही नदीनाले भरून वाहले नाही. अशात अजूनही मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
कोट.....
यंदा पाऊस कमी आल्यामुळे तलावात पाणी साठा कमी आहे. अशीच परिस्थिती राहिली तर खरीप पिकाला वाचविण्याकरिता पाणी देणे कठीण होईल.
पी.ए. तायसेटे,क.अभियंता, मानागड पाटबंधारे प्रकल्प