नागरी आरोग्य सुविधा केंद्र वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 10:05 PM2019-05-27T22:05:46+5:302019-05-27T22:05:58+5:30

जिल्ह्याची आरोग्यसेवा पूर्णत: ढेपाळलेली आहे. महिन्याभरापूर्वी येथील जिल्हा रुग्णालयात मुदतबाह्य औषधांचा पुरवठा केल्याचा प्रकार उजेडात आला होता. तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी आकस्मिक भेट दिली. परंतु परिस्थिती जैसे थे आहे. असे असताना, शहरातील कुंभारेनगर येथील नागरी आरोग्य सुविधा केंद्र रामभरोसे सुरु असल्याचा प्रकार उजेडात आला आहे. तेथील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी अनुपस्थित राहतात. येथील ढिसाळ कारभारामुळे रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे. याकडे पालिकेचे दुर्लक्ष आहे. दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे.

Civic Health Facilitation Center | नागरी आरोग्य सुविधा केंद्र वाऱ्यावर

नागरी आरोग्य सुविधा केंद्र वाऱ्यावर

Next
ठळक मुद्देवैद्यकीय अधिकारी पाच दिवसांपासून केंद्रात अनुपस्थित : जिल्हा आरोग्य विभागाच्या कारभाराचे पितळ उघडे

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्याची आरोग्यसेवा पूर्णत: ढेपाळलेली आहे. महिन्याभरापूर्वी येथील जिल्हा रुग्णालयात मुदतबाह्य औषधांचा पुरवठा केल्याचा प्रकार उजेडात आला होता. तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी आकस्मिक भेट दिली. परंतु परिस्थिती जैसे थे आहे. असे असताना, शहरातील कुंभारेनगर येथील नागरी आरोग्य सुविधा केंद्र रामभरोसे सुरु असल्याचा प्रकार उजेडात आला आहे. तेथील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी अनुपस्थित राहतात. येथील ढिसाळ कारभारामुळे रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे. याकडे पालिकेचे दुर्लक्ष आहे. दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे.
दशकापूर्वी पालिकेच्या अधिनस्त येथील रेलटोली परिसरात धोटे सूतिकागृह सुरु होते. रुग्णालयात गरोदर महिलांवरील उपचार व प्रसुती केली जात होती. याकडे पालिकेचे दुर्लक्ष झाले. नावाजलेल्या सूतिकागृह इमारतीला तडे गेले. कालांतराने बंद झाले. अशातच, शहरातील कुंभारेनगर येथे नागरी आरोग्य सुविधा केंद्र उभारण्यात आले. येथील केंद्रात विविध कामांकरीता २३ कर्मचारी व ५३ आशा सेविका कार्यरत असून ५ बेड आहे. दरदिवशी शंभराहून अधिक रुग्ण उपचार करवून घेतात. रुग्णालयात योग्यरित्या उपचार केला जातो. त्यानुसार, त्यांना औषध पुरवठा केला जातो. मात्र मागील आठवड्याभरापासून नागरी आरोग्य सुविधा केंद्रात कार्यरत वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा येडे या अनुपस्थित आहेत. केंद्रात जबाबदार वैद्यकीय अधिकारी नाही. त्यामुळे रुग्णांना नाहक त्रास सहन करुन आल्यापावली परत जावे लागते. येथील ढिसाळ कारभाराला घेऊन नागरिकांनी संबंधितांना तक्रार केल्या, परंतु, अद्यापपर्यंत वैद्यकीय अधिकारी पोहोचले नाही. येथील महिलांनी बहुजन समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष पंकज यादव यांच्याकडे तक्रार करुन निदर्शनास आणून दिले. त्यांनी आरोग्य केंद्राला आकस्मिक भेट दिली. तेथील परिस्थिती जाणून घेतली. दरम्यान, नगर पालिकेतील प्रशासकीय अधिकारी सी.ए.राणे यांना केंद्रात बोलाविले. तेथील हजेरी रजिस्टरचे त्यांनी अवलोकन केले.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. येडे या २० मे पासून अनुपस्थित असल्याचे समजून आले. दरम्यान, प्रशासकीय अधिकारी राणे यांनी तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला व विचारणा केली. यावेळी डॉ. चौरागडे यांनी कोणतीही सूचना न दिल्याचे सांगितले. यावर, प्रशासकीय अधिकारी राणे यांनी तहसील वैद्यकीय अधिकारी डॉ. चौरागडे व डॉ. येडे यांना कारणे दाखवा, नोटीस जारी केली. उल्लेखनीय म्हणजे, येथील नागरी आरोग्य सुविधा केंद्रात कार्यरत डॉ. पूजा शर्मा, या एक महिन्यांपासून रजेवर आहेत.
त्यांच्या अनुपस्थितीत तेथील जबाबदारी डॉ. येडे यांच्यावर आहे. त्यांनीही सूचना न देता गैरहजर असल्याने केंद्रातील भोंगळ कारभार उजेडात आला आहे.
ही चिंतनाची बाब आहे. यावर आरोग्य प्रशासन कोणता तोडगा काढते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

दोषींवर कठोर कारवाई करा
येथील वैद्यकीय अधिकारी सूचना न देता, अनुपस्थित राहतात. रुग्णांचा योग्य उपचार होत नाही. येथील कर्मचाºयांकडून गैरप्रकारे औषधीचा पुरवठा केला जातो. चुकीच्या औषध पुरवठ्यामुळे रुग्णांचा जीव टांगणीवर आला आहे. येथील बेजबाबदार अधिकारी-कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, तसेच आरोग्य सेवा सुरळीत व्हावी, अशी मागणी बसपचे जिल्हाध्यक्ष पंकज यादव, सुमित बोरकर, धनराज छुरा, हत्तीमारे यांनी केली आहे.

Web Title: Civic Health Facilitation Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.