नाल्या स्वच्छ करून औषध फवारणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:27 AM2021-05-22T04:27:22+5:302021-05-22T04:27:22+5:30
देवरी : शहरातील नाल्या गाळ व कचऱ्यामुळे तुंबलेल्या आहेत व त्यामुळे डासांचा हैदोस शहरात मागील ३ महिन्यांपासून वाढलेला आहे. ...
देवरी : शहरातील नाल्या गाळ व कचऱ्यामुळे तुंबलेल्या आहेत व त्यामुळे डासांचा हैदोस शहरात मागील ३ महिन्यांपासून वाढलेला आहे. यामुळे पावसाळ्यात पाणी तुंबण्याचा धोका निर्माण होणार असून, डासांच्या वाढत्या प्रभावामुळे डेंग्यू-मलेरियासारख्या रोगांचा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. करिता मुख्याधिकारी या नात्याने शहरातील संपूर्ण प्रभागांचा सर्व्हे करून पावसाळ्यापूर्वी शहरातील संपूर्ण नाल्या स्वच्छ करण्याचे निर्देश सफाई कर्मचाऱ्यांना द्यावे, अशी मागणी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवेदनाद्वारे केली आहे.
शहरातील प्रभाग क्रमांक १,५, ६ व १४ या प्रभागातील तुंबलेल्या नाल्या स्वच्छ करण्यास नगर पंचायतच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना सांगितल्या. नंतरही शहरातील संपूर्ण प्रभागातील नाली स्वच्छतेची पावसाळ्यापूर्व कामे सुरू झालेली नाहीत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी शहरातील नाल्यांची सफाई करून डासांवर प्रतिबंधात्मक फवारणी करण्यात येते; परंतु यावर्षी कोणतीही कामे नगर पंचायततर्फे शहरात करण्यात आलेली नाहीत. पावसाळ्याला सुरुवात झाल्यास नालीतील गाळ काढणे शक्य न झाल्यास याचा त्रास शहरवासीयांना सहन करावा लागेल. याकरिता या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली आहे. निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष मुकेश खरोले, दीपेश टेंभरे, दिलीप द्रुपकर, सुजित अग्रवाल, मुन्ना हंसारी, अरविंद शेंडे, मोसीन हंसारी, कैलास कोडापे, आलिक हंसारी उपस्थित होते.