सफाई अभियानाचे काम दिसेना
By admin | Published: June 13, 2016 12:10 AM2016-06-13T00:10:25+5:302016-06-13T00:10:25+5:30
मुंबईत हजेरी लावल्यानंतर वरूणदेव जिल्ह्याची कधीही आंघोळ घालण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शहरातील चित्र जैसे थे : नाल्या तुंबलेल्या व कचरा पडूनच
गोंदिया : मुंबईत हजेरी लावल्यानंतर वरूणदेव जिल्ह्याची कधीही आंघोळ घालण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे असतानाही शहरातील नाल्या व कचऱ्याची स्थिती जैसे थेच दिसून येत आहे. यामुळे मान्सूनपूर्व सफाई अभियानाला घेऊन संभ्रम निर्माण होत असून सफाई अभियान राबविले जात असताना त्याचे काम मात्र दिसून येत नसल्याचे चित्र आहे.
पावसाळ्यापूर्वी नगर परिषदेच्यावतीने मान्सनपूर्व सफाई अभियान राबविले जाते. यंदाही नगर परिषदेने अभियान हाती घेतले. यासाठी जेसीबीच्या माध्यमातून मोठ्या नाल्यांची सफाई करण्यात आली. तर शहरातील मुख्य नाल्यांच्या सफाईसाठी २० सफाई कामगारांची टीम कंत्राटी तत्त्वावर घेण्यात आली आहे. जेसीबीच्या माध्यमातून नाल्यांची सफाई केल्याचे नगर परिषदेकडून कळले. मात्र नाल्यांचे चित्र बघितल्यास ते होते तसेच दिसून येत आहेत. यातून नाल्यांतील गाळ पूर्णपणे उपसण्यात आला नसल्याचेही आता शहरवासी बोलत आहेत.
याशिवाय शहरातील सांडपाण्याची निकासी करीत असलेल्या मुख्य नाल्यांची सफाई करण्यासाठी नगर परिषदेने २० सफाई कामगार कंत्राटी तत्वावर घेतले आहेत. सोमवारपासून (दि.६) या सफाई कामगारांकडून नाल्यांची सफाई करविण्यात येणार असल्याचे सांगीतले गेले. मात्र या कामगारांकडून कोणत्या भागातील नाल्यांची सफाई करविण्यात आली हे कळतच नाही. विशेष म्हणजे शहरातील बाजार भागातील नाल्या तुंबलेल्या आहेत. त्यांची सफाई करण्यात आली नाही. अशात पावसाच्या पाण्याची निकासी कशी होणार असा प्रश्न येथे पडतो.
आता कधीही पाऊस बरसणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. असे असतानाही शहरातील नाल्या व घाण आहे त्यात स्थितीत असल्याने यंदाचा पावसाळा शहरवासीयांसाठी डोकेदुखीचाच ठरणार असल्याचे दिसते. त्यामुळे जोर लावून सफाईची कामे पूर्ण करण्याची गरज आहे. अन्यथा पावसाचे पाणी लोकांच्या घरात शिरण्याची समस्या सुटणार नाही. (शहर प्रतिनिधी)